
‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत मुंबई शहरासह उपनगरांतील गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. यंदाही ताडदेव येथील व्ही. एम. वाडिया चाळ येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत ‘ममता चषक दहीहंडी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने गोविंदा पथकांच्या थरांचा थरार अनुभवता येणार असून, महोत्सवात तब्बल ४ लाख ४४ हजार ४४४ रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.
शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांच्या जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी ममता चषक दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले जाते. या भव्यदिव्य दहीहंडी उत्सवात मुंबई शहर आणि उपनगरांतील नामांकित गोविंदा पथके आवर्जून हजेरी लावतात. या साहसी खेळाचा श्वास रोखून धरायला लावणारा थरार पाहायला मोठ्या संख्येने नागरिक येथे जमतात. रात्री ८ नंतर दिवसभरात सात किंवा त्याहून अधिक थर लावणाऱ्या गोविंदा पथकांची एक कौशल्याची स्पर्धा येथे आयोजित केली जाते. विक्रमी वेळेत सुरक्षितपणे चढाई करून उतरणाऱ्या गोविंदा पथकाला ममता चषकाची ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात येते. या कार्यक्रमाला मलबार हिल विधानसभा प्रमुख अरुंधती दुधवडकर, शाखाप्रमुख विजय पवार, शाखा संघटक सुप्रिया शेडेकर, महिला समन्वयक स्वाती वळंजू आणि युवासेना उपसचिव हेमंत दुधवडकर उपस्थित राहणार आहेत.

























































