
जयपूरमध्ये एका गोठ्यात भरवल्या जाणाऱ्या शाळेविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. जयपूरमधील रामपुरा कंवरपुरा गावातील सरकारी शाळेची जीर्ण झालेली ती इमारत अखेर बुधवारी पाडण्यात आली. आता 18 लाख रुपये खर्च करून नवीन इमारत बांधली जाणार आहे. 21 ऑगस्ट रोजी कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत या शाळेला भेट देण्यासाठी आले असता त्यांच्यावर हल्ला झाला होता. सरकारने शाळेची इमारत नव्याने बांधण्याची घोषणा केल्यानंतर सीजेपीने त्यांच्या मोहिमेचा विजय असल्याचे म्हटले आहे.
सरकारी शाळांची दुरवस्था सुधारण्याचे उद्दिष्ट असलेल्या अभियानाचा हा विजय असल्याचे कॉक्रोच जनता पार्टीने म्हटले आहे. ही शाळा म्हशींच्या गोठ्यात चालवली जात होती, असा आरोप सीजेपीकडून करण्यात आला होता. शाळेची पाहणी करण्यासाठी गेलो असता आमच्यावर दगडफेक करण्यात आली, महिलांवर हल्ले झाले आणि गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. पण मुलांसाठी चांगली शाळा बांधली जाईल, तेव्हा या सर्व त्रासाचे चीज होईल, असे रांका यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.


























































