
उपनगरी रेल्वे मार्गावर रूळ ओलांडणाऱ्यांचे प्रकार अद्याप सुरूच आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. त्यानुसार मध्य रेल्वे विभागातील 27 आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 11 ठिकाणे ‘हॉटस्पॉट्स’ म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहेत. मुंबईतील या 38 ‘हॉटस्पॉट्स’वर रेल्वे पोलीस कडक पाळत ठेवणार आहेत.
‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असलेल्या उपनगरी रेल्वे मार्गावर अपघाती मृत्यूचे सत्र सुरू राहिले आहे. यात रेल्वे रुळ ओलांडून होणारे मृत्यूदेखील चिंतेचा विषय बनला आहे. त्याच अनुषंगाने रुळ ओलांडणाऱ्यांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागातील 38 ‘हॉटस्पॉट्स’वर कडक पाळत ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वे विभागाचे पोलीस उपायुक्त, चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेचे पोलीस उपायुक्त आणि सीएसएमटी, कल्याण, वांद्रे, वसई आणि हार्बर लाईन या विभागांच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. या मोहिमेंतर्गत रेल्वे स्थानकांतील अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करणे, रूळ ओलांडणे रोखण्यासाठी कुंपण घालणे, आवश्यक तेथे कुंपणाची उंची वाढवणे आदी उपाय केले जाणार आहेत.
‘खाकी सखी’ पथकाद्वारे स्थानकांत जनजागृती मोहीम
रूळ ओलांडण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे स्थानकांवर ‘खाकी सखी’ पथकाद्वारे जनजागृती मोहीम राबवली जात आहे. हे पथक प्रवाशांना रूळ न ओलांडण्याचे आवाहन करीत असून ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्याबरोबर पथनाट्ये सादर केली जात आहेत. तसेच शाळा, महाविद्यालये आणि झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत.




























































