
मुंबईत गेल्या महिनाभरापासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी पावसाळी आजारांनी मात्र चांगलेच बस्तान मांडले आहे. जून ते ऑगस्टमध्ये मलेरियाचे तब्बल 4485 तर डेंग्यूचे 1563 रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहिली असता रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉईड, का@लरा, जाँडीस असे आजार होतात. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्य़ासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात येते. कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूम्र फवारणी मोहीम व्यापकपणे राबवण्यात येते. तरीदेखील साचणारे पावसाचे पाणी आणि अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावत आहेत. यामध्ये जून ते ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत डेंग्यूला कारणीभूत ठरणाऱया एडिसचे 3733 तर मलेरियाला कारणीभूत ठरणाऱया एनोफिलीस डासामुळे 1972 जण बाधित झाल्याचे समोर आले होते. ऑगस्टमध्ये ही संख्या आणखी वाढली आहे.
अशी घ्या काळजी…
पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
असे आढळले रुग्ण
आजार रुग्णसंख्या
मलेरिया 4485
डेंग्यू 1563
चिकनगुनिया 46
लेप्टो 255
गॅस्ट्रो 1954
एच1एन1 441
कोरोना 151
अशी आढळली एडिस, अॅनोफिलीसची उत्पत्ती
> ऑगस्टमध्ये पालिकेने 50 हजार 629 घरांची तपासणी केली. यामध्ये 234591 लोकांचेही सर्वेक्षण करण्यात आले.
> तर मलेरियाच्या ‘अॅनोफिलीस’ची 52117 ठिकाणे तपासण्यात आली. यात 8055 ठिकाणी अॅनोफिलीसची उत्पत्तीस्थाने आढळली.
> तर डेंग्यूच्या एडिस डासाच्या शोधासाठी 1255459 ठिकाणे तपासण्यात आली. यात 27 हजार 352 ठिकाणी एडीस आढळला.






























































