
दरवर्षी सप्टेंबर महिना हा ‘राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध महिना’ म्हणून पाळला जातो. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि आत्महत्या रोखणे हा यामागचा हेतू आहे. यानिमित्त उद्या, गुरुवारी दुपारी 1 ते सायंकाळी 4 या वेळेत कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतन, चर्चगेट येथे ‘आत्महत्येची कथा बदलूया – एक प्रश्न विचारा, एक जीव वाचवा’ हा विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
अनकही, दीपज्योती इंडिया फाऊंडेशन, द कनेक्ट हट, कलर पॉझिटिव्ह तसेच डब्ल्यूआयसीसीआय – होलिस्टिक चाईल्ड डेव्हलपमेंट काऊन्सिल, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जीवनानुभवावर आधारित संवाद, तज्ञांचे पॅनेल त्यानंतर प्रश्नोत्तर सत्र आणि विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद अशा दोन सत्रांत होणार आहे. सुमारे दोनशे विद्यार्थी, मानसिक आरोग्यतज्ञ, कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होऊन आत्महत्या प्रतिबंध, मानसिक आरोग्य, मदत मागण्याचे महत्त्व, संकटातून सावरण्याची क्षमता आणि मानवी नात्यांची ताकद यावर चर्चा करतील.





























































