
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम पार पडल्यानंतर रायगड जिल्ह्यातील ५ लाख ८४ हजार ११८ मतदारांना उडवल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे. त्यामुळे मतदार यादीलाही मोठा धक्का बसला असून पनवेल विधानसभेत सर्वाधिक २ लाख ८३ हजार नावे वगळली आहेत. पुनरीक्षण करण्यापूर्वी रायगडात २५ लाख ३३ हजार ७८२ मतदार होते. आता तब्बल पाच लाखांनी हे मतदार घटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांचे पुनरीक्षण सुरू होते. त्यानंतर आता किती मतदार प्रत्यक्षात आहेत, किती नावे वगळली याबाबतचा लेखाजोखा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पनवेल विधानसभा मतदारसंघात २ लाख ८३ हजार ३५६ एवढी नावे वगळल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तर उरणमध्ये ८४ हजार ४१६, कर्जतमध्ये ६१ हजार ८८१, महाडमध्ये ४५ हजार ४६८, अलिबागमध्ये ४२ हजार ७६०, पेणमध्ये ३७ हजार १२२ आणि श्रीवर्धनमध्ये २९ हजार ११५ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
॥ प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता वगळण्यात आलेल्या मतदारांसाठी दावा-हरकतीचा मार्ग खुला करण्यात आला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित मतदारांना आपले नाव यादीत पुन्हा समाविष्ट करण्यासाठी दावे अथवा हरकती दाखल करता येणार आहेत. ॥ प्राप्त दावे-हरकतींची प्रशासनाकडून छाननी करून त्यावर २९ ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ४ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
पालघरमधील ६ लाख नावे ‘आऊट’
पालघर जिल्ह्यातील २३ लाख ७६ हजार ५३ मतदारांपैकी तब्बल ६ लाख ६८ हजार ९०५ मतदार ‘आऊट’ झाले आहेत. त्यापैकी काही मतदार हे मृत, स्थलांतरित तसेच गैरहजर असलेले आढळून आले आहे. तर अनेकांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्याने त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. मॅपिंग नसलेले व तांत्रिक चुकीमुळे वगळलेल्या ३ लाख ९२ हजार मतदारांची सुनावणी केली जाणार आहे.
मतदारांनो, नावे तपासा !
लाखांहून अधिक नावे वगळली गेल्याने या मतदारांना पुन्हा नावे नोंदवण्याची संधी मिळणार आहे. ३० सप्टेंबरची मुदत चुकवू नका, अन्यथा अंतिम मतदार यादीत नाव नसण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्याशिवाय आपल्या नावांची तपासणी करून त्यात बदल करायचा असल्यास योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




























































