
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यापासून ते मुख्य आरोपी अभय कुरुंदकर गजाआड होईपर्यंत अश्विनी यांचे पती आणि कन्या यांना करावा लागलेला संघर्ष अद्यापपर्यंत संपण्याचे नाव घेत नाही. अश्विनी यांच्या हत्येप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावून १७ महिने लोटले तरी बिद्रे यांच्या मृत्यूचा दाखला अद्यापपर्यंत कुटुंबाला मिळालेला नाही. विशेष म्हणजे अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखला देण्याचे आदेश तहसीलदारांनी पनवेल महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी मागणी केलेली ४०० पानांची कागदपत्रे पालिकेकडे जमा केली आहेत.
अश्विनी बिद्रे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी हत्या झाल्याचे पनवेल सत्र न्यायालयाने २१ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. याआधारे पती राजू गोरे यांनी मृत्यू दाखल्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात दाद मागितली होती. त्यानुसार पनवेलच्या कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार मीनल भामरे भोसले यांनी सर्व कायदेशीर बाबी, पोलीस अहवाल व न्यायालयीन निकालाची पडताळणी करून ३१ जुलै रोजी अधिकृत आदेश निर्गमित केला आहे. या आदेशात पनवेल महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाला सन २०१६-२०१७च्या नोंदवहीत अश्विनी बिद्रे यांच्या मृत्यूची नोंद घेऊन अर्जदारास तत्काळ मृत्यू दाखला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेकडून अधिकृत मृत्यू दाखला मिळत नसल्यामुळे अश्विनी यांच्या निधनानंतर मिळणारे कोणतेही शासकीय अथवा सेवेचे लाभ अद्याप त्यांची मुलगी सुची हिला मिळालेले नाहीत. मृत्यू दाखल्याअभावी सुची हिच्या पुढील उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेत आणि प्रवेशात अडचणी येत आहेत.
राजू गोरे यांनी तहसीलदारांचा आदेश, सत्र न्यायालयाचा निकाल, कळंबोली पोलिसांचे अहवाल तसेच पालिकेने मागितलेली तब्बल ४०० हून अधिक पानांची कागदपत्रे पालिकेच्या निबंधक कार्यालयाकडे सुपूर्द केली आहेत.
या कामासाठी गोरे यांनी कोल्हापूरहून पनवेल महापालिकेत येऊन दोन वेळा अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. मात्र तरीही आजतागायत पालिकेच्या दप्तरी अश्विनी बिद्रे यांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली नाही.
न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे, तहसीलदारांनी मृत्यू दाखला देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत, आम्ही शेकडो पानांचे पुरावेही दिले, तरीही महापालिका प्रशासन दाखला देण्यास टाळाटाळ करत आहे. प्रशासनाच्या या असंवेदनशील कारभारामुळे माझ्या मुलीच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे, अशी प्रतिक्रिया अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केली आहे.




























































