
ठाणे पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर आता भूमाफियांनी डोळा ठेवला असून त्या ठिकाणी दगडखाणी उभारल्या आहेत. आतकोली भूखंडावर दगडखाणी तयार करून माफियांनी कोट्यवधींचा महसूल बुडविला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. पालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दगडचोरीला अभय दिले आहे का? या दगडचोरीत पालिकेचे अधिकारी सहभागी आहेत का, असा सवाल उपस्थित केला आहे.
भिवंडीतील आतकोली येथील ३४ हेक्टर जमीन राज्य शासनाने डम्पिंग ग्राऊंड ठाणे महापालिकेला दिली आहे. या भूखंडावर शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पाच्या पूर्वतयारीचे काम सुरू आहे. एकीकडे पालिकेच्या मालकीचे डम्पिंग ग्राऊंड असतानाही दिवा परिसरात कचरा टाकला जात असल्याने आतकोली येथे पाहणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान गेले होते. त्यावेळी या भागात चक्क दगडखाणी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. या ठिकाणी बेकायदेशीरपणे दगडखाणी सुरू करण्यात आल्याची तक्रार १० जानेवारी २०२५मध्ये पडघा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. वास्तविक पाहता ही तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्याऐवजी ती पडघा पोलीस ठाण्यात करण्यात आल्याने आश्यर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली
आतकोली येथील ३४ हेक्टरची ही जागा सन २०२४मध्ये पालिकेच्या ताब्यात आली आहे. या भूखंडावर आजही दगडखाण व्यवसाय सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत अंदाजे ३० फूट खोदकाम सुरू असून हजारो कोटींची रॉयल्टी जमाच करण्यात आलेली नाही. दगडखाणीसाठी रीतसर लिलाव केला असता तर पालिकेच्या तिजोरीत किमान १२ हजार कोटींची भर पडली असती. मात्र घनकचरा विभागाने चोरांच्या हातात चाव्या दिल्या आहेत, असा आरोप प्रधान यांनी केला.




























































