मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विश्वस्तपदी संजय राऊत, अनिल देसाई, सुप्रिया सुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-marathi-granth-sangrahalaya-trustees-re-elected-sanjay-raut-anil-desai-supriya-sule

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विश्वस्तपदी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्यासह खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे व अरविंद तांबोळी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी संस्थेच्या दादर येथील सभागृहात पार पडली.

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विश्वस्त समितीची निवड करण्यात आली. या सभेत ग्रंथसंग्रहालयाच्या डिजिटलायझेशन प्रकल्पाची माहितीही देण्यात आली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात सहा लाखांहून अधिक पुस्तके, मासिके, हस्तलिखिते आहेत. यातील अनेक पुस्तके अत्यंत दुर्मिळ आहेत. जगात पुठेही असलेल्या वाचकाला, अभ्यासकाला इंटरनेटच्या माध्यमातून ही शब्दसंपदा उपलब्ध व्हावी या दृष्टीने डिजिटलायझेशनचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एक कोटीहून अधिक पाने स्कॅन करण्यात येणार आहेत. आतापर्यंत 15 लाख पानांचे स्कॅनिंग झाले असून दररोज 20 ते 25 हजार पानांचे स्कॅनिंग होत आहे, अशी माहिती प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी दिली. राज्य सरकारने या कामासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी तीन कोटी रुपये प्राप्त झाले असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असेही गावडे यांनी सांगितले.