अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक, मतदारयादीवर संगमनेरातून सर्वाधिक 123 हरकती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदारयादीवर हरकती दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हरकती दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 204 हरकती आणि सूचना तर एकूण 238 हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक 123 हरकती संगमनेर तालुक्यातून दाखल झाल्या आहेत.

जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदारयादीवर हरकती आणि सुनावणी होऊन अंतिम यादी 15 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे. तालुकानिहाय दाखल हरकतीमध्ये नेवासा 14, अकोले 14, पारनेर 10, जामखेड 7, कर्जत 10, श्रीगोंदा 12, नगर तालुका 12, राहुरी 3, श्रीरामपूर 5, राहाता 9, पाथर्डी 6, शेवगाव 4, कोपरगाव 9, संगमनेर 123 अशा एकूण 238 दाखल आहेत.

पुन्हा ठराव घेण्याचे खंडपीठाचे आदेश

पाथर्डी तालुक्यातील एका सेवा संस्थेच्या ठरावाचे प्रकरण थेट छत्रपती संभाजीनगर खंडपीठात पोहोचले. न्यायालयात या प्रकरणावर चर्चा होऊन याचिकाकर्त्याच्या वतीने पुन्हा ठराव घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खंडपीठात जाणारे पाथर्डी तालुक्यातील हे प्रकरण बहुदा पहिले ठरणार आहे.