अलिबागच्या कार्लेखिंड-सारळपूल रस्त्याला तडे; साईडपट्ट्या धोकादायक, १८८ कोटींच्या कामाचे बिंग फुटले, माती-मोठमोठ्या दगडांमुळे अपघाताचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा करूनही कार्ले खिंड-सारळपूल मार्गाची दैना उडाली आहे. नव्याने तयार केलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याला ठिकठिकाणी तडे पडले असतानाच आता साईटपट्टीच्या नावाखाली माती आणि मोठमोठे दगड टाकण्यात आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा मार्ग वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला असून १८८ कोटींच्या कामाचे बिंग फुटले आहे.

अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड ते सारळपूल, सारळपूल ते अलिबाग बायपास आणि कार्लेखिंड ते वायशेत या मार्गांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. एमएसआयडीसीच्या देखरेखीखाली हे काम सुरू असून वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीकडे या कामाचा ठेका आहे. सद्यस्थितीत कार्लेखिंड ते सारळपूल व कार्लेखिंड ते वायशेतदरम्यान काम सुरू आहे. मात्र मार्गाचे ३० ते ४० टक्क्यांपेक्षाही कमी काम पूर्ण झाले असताना नव्याने तयार केलेल्या काँक्रीट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे पडू लागले आहेत. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रस्त्याचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी वाहनांना सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी साईटपट्टी तयार करणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही ठिकाणी साईटपट्टीच्या नावाखाली मातीचा भराव तसेच मोठमोठे दगड टाकण्यात आले आहेत.

रस्त्यावरून वेगाने येणाऱ्या वाहनाला अचानक बाजूला घ्यावे लागल्यास हे दगड गंभीर अपघाताला आमंत्रण देऊ शकतात. विशेषतः रात्रीच्या वेळी दगड स्पष्टपणे दिसत नसल्याने दुचाकीस्वारांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

कार्लेखिंड ते सारळपूल मार्गाचे काम सुरू आहे. साईटपट्टीच्या भरावासाठी मागवलेल्या मातीसोबत दगड आले आहेत. साईटपट्टीत टाकण्यात आलेले दगड काढून टाकण्यात येतील व साईटपट्टीचे काम व्यवस्थित करण्यात येईल. तसेच रस्त्याचे काम गुणवत्ता पूर्वक पूर्ण करण्यात येत आहे.- अरुण चौधरी, प्रकल्प व्यवस्थापक, वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लि.