खुर्चीसाठी भाजपच्या घरातच दंगल! विखे-शिंदे आमने—सामने; प्रारूप यादीपूर्वीच राजकीय फासे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मिलिंद देखणे

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे अधिकृत रणशिंग अद्याप वाजायचे आहे. मात्र, त्याआधीच राजकीय आखाडय़ात तलवारी उपसल्या गेल्या आहेत. बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गटाने कंबर कसल्याची चर्चा असतानाच, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही स्वतंत्र राजकीय मोर्चेबांधणी सुरू केल्याच्या हालचालींनी भाजपच्या घरातीलच संघर्ष चव्हाटय़ावर आला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक आता ‘विरोधक विरुद्ध सत्ताधारी’ अशी न राहता सत्ताधाऱयांच्या घरातीलच ‘वर्चस्वाची लढाई’ ठरण्याची चिन्हे आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आपले प्रभावक्षेत्र कायम ठेवण्यासाठी विखे गट कोणतीही कसर सोडणार नसल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्रिपदामुळे जिह्यातील राजकीय समीकरणांवर प्रभाव असताना त्यात जिल्हा बँकेवरील पकडही कायम राहावी, यासाठी विखे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. ‘बँक हातातून जाऊ द्यायची नाही,’ असा निर्धार करत उमेदवारांची चाचपणी, मतदारसंघनिहाय गणिते आणि संभाव्य साथीदारांची जुळवाजुळव याला वेग आला आहे.

विखे गटाची तयारी सुरू असतानाच, राम शिंदे यांनी टाकलेल्या राजकीय पावलांनी सत्तेच्या गोटात खळबळ उडाली आहे. श्रीरामपूरचे भानुदास मुरकुटे, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांच्याशी संपर्क आणि त्यानंतर माजी खासदार यशवंतराव गडाख यांची घेतलेली भेट यामुळे शिंदे कोणता डाव आखत आहेत, याची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे. स्वतंत्र पॅनल उभारण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली, तरी या भेटीगाठींना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. शिंदे यांनी गडाख यांची भेट घेतल्यानंतर विखे यांनीही गडाख यांची भेट घेत ‘जुने नाते’ अधोरेखित केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवत प्रतिहल्ल्याची रणनीती आखली जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्हा बँकेच्या खुर्चीसाठी राजकीय पटावर प्याद्यांच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.

विशेष म्हणजे हा संघर्ष विरोधी पक्षांमध्ये नसून सत्तेच्या छत्राखालील दोन प्रभावी गटांमध्ये उभा राहत असल्याने त्याचे पडसाद महायुतीच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता आहे. राम शिंदे यांनी स्वतंत्र पॅनल प्रत्यक्षात उभे केले तर भाजपसमोर घरातीलच आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठाRचीही कसोटी लागणार आहे. एकीकडे विखे गटाची बँक ताब्यात ठेवण्याची धडपड आणि दुसरीकडे शिंदे गटाची ताकद आजमावण्याची तयारी, यामुळे जिह्यातील सहकार राजकारण तापू लागले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक म्हणजे केवळ संचालक निवडण्याची प्रक्रिया नसून जिह्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई बनत चालली आहे.