
अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना घडली. मिनियापोलिस शहराच्या मध्यवर्ती भागातील एका इमारतीत झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले आहेत. तसेच तीन पोलीस अधिकाऱ्यांसह सात जण जखमी झाले. गोळीबार करणाराचाही मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूचे कारण तात्काळ स्पष्ट झाले नाही. एका पीडिताचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, जखमी अधिकाऱ्यांपैकी एकाची प्रकृती स्थिर आहे. दुपारी 4.30 च्या सुमारास पोलिसांना गोळीबाराबाबत कॉल आला. सुमारे तीन मिनिटांनंतर अधिकारी इमारतीत शिरले असता त्यांना इमारतीत पीडित व्यक्ती आढळल्या, असे पोलीस सार्जंट गॅरेट पार्टेन यांनी सांगितले.
त्यानंतर अधिकाऱ्यांना पुन्हा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता जिथे दाट धुक्यामुळे काही स्पष्ट दिसत नव्हते. यात तीन पोलीस अधिकाऱ्यांसह सात जण जखमी झाले.


























































