
दिल्ली जल बोर्ड निविदा घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जैन यांच्या अटकेच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “या सगळ्यातून तुम्ही नेमके काय मिळवले?” असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.
सत्येंद्र जैन यांना जामीन मिळाल्याची बातमी समोर येताच केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “त्यांना मुळात अटक का करण्यात आली होती? हे अद्याप कोणालाही समजू शकलेले नाही,” असे म्हणत त्यांनी या कारवाईमागे केवळ राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प निविदा प्रक्रियेतील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी काही दिवसांपूर्वी जैन यांच्यासह जल बोर्डाचे तत्कालीन अधिकारी उदित प्रकाश राय यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आलेल्या सत्येंद्र जैन यांनीही या खटल्याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संपूर्ण कारवाईला एक अनोखे आणि आश्चर्यकारक प्रकरण असल्याचे म्हटले आहे. जैन यांना मिळालेला जामीन हा आम आदमी पक्षासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.




























































