
नेत्रहीनांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करण्यासाठी सध्या नेत्रदान पंधरवडा सुरू आहे. नेत्रदानासाठी अनेक सेलिब्रेटी पुढे आले आहेत, पण सर्वसामान्यांमध्ये अद्याप पुरेशी जागृती होताना दिसत नाही. नेत्रतज्ज्ञांच्या मते देशाला सुमारे २ लाख ८८ हजार नेत्रपटलांची (कॉर्निया) गरज आहे, पण सध्या केवळ ४८ ते ५० हजार कॉर्निया नेत्रदानातून उपलब्ध होतात. त्यामुळे नेत्रदानाच्या चळवळीला बळ देण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. या काळात नेत्रदानाविषयी विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था आणि नेत्ररोगतज्ज्ञ जनजागृती कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करतात. या निमित्ताने प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शशी कपूर यांनी नेत्रदानाचे महत्त्व विशद केले.
“श्रीलंकेत नेत्रदानाबाबत मोठी जनजागृती झालेली आहे. आज श्रीलंकेत दर पाच व्यक्तींमागे एक व्यक्ती स्वेच्छेने नेत्रदान करते. श्रीलंकेतील नेत्रदानाची गरज भागवून या देशाने इतर देशांना कॉर्निया (नेत्रपटल) पाठवल्याची उदाहरणे आहेत.”— डॉ. शशी कपूर, नेत्ररोगतज्ज्ञ
बॉलीवूड कलाकारांचा नेत्रदानाचा संकल्प
काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे निधन झाले. या अभिनेत्याने नेत्रदानाचा निर्णय घेतला होता. पुनीत राजकुमार यांच्यामुळे चार नेत्रहीनांना दृष्टी मिळाली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, सलमान खान, रणदीप हुडा, सुनील शेट्टी, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, आलिया भट यांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे.
अधिक नेत्रदात्यांची गरज
‘आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया’च्या ताज्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी सरासरी ४७ ते ६३ हजार कॉर्नियाचे (नेत्रपटल) संकलन होते. देशात दरवर्षी एक लाख नेत्रप्रत्यारोपणाची गरज आहे, पण देशात दरवर्षी सरासरी ४० ते ४८ हजारच प्रत्यारोपण होत असल्याची आकडेवारी आहे.



























































