
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील शिपाईपदाच्या 89 जागांसाठी रविवारी (दि. 6) लेखी परीक्षा होणार आहे. सांगलीतील पाच, तर आष्टा येथील एक अशा सहा केंद्रांवर तब्बल 4 हजार 489 उमेदवार परीक्षा देणार आहेत. लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची 30 गुणांची मुलाखत होणार आहे. यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत कनिष्ठ लिपिकपदाच्या 444 तसेच शिपाईपदाच्या 89 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यातील कनिष्ठ लिपिकपदासाठी 31 ऑगस्ट 2026 रोजी लेखी परीक्षा होणार होती. मात्र, या परीक्षेसाठी सांगलीतील हजारो उमेदवारांना जिह्यापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या अन्य जिह्यातील परीक्षा केंद्रे मिळाली. याला बॅँकेच्या संचालक मंडळाने मान्यता दिली नाही. सदरची केंद्रे सांगली जिह्यात फारतर पश्चिम महाराष्ट्रातच असावीत, अशी मागणी बॅँकेने आयबीपीएस कंपनीकडे केली आहे. याला कंपनीने मान्यता देत 31 ऑगस्टची परीक्षा रद्द केली. अद्याप परीक्षेची नवीन तारीख जाहीर झालेली नाही.
दरम्यान, शिपाईपदासाठी मात्र आता लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली. बॅँकेत शिपाईपदाच्या 89 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 4 हजार 489 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. या उमेदवाराचीं लेखी परीक्षा रविवारी (दि. 6) होणार आहे. ही परीक्षा सांगलीतील सिटी हायस्कूल, पुरोहित हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, मालू हायस्कूल व केडब्ल्यूसी महाविद्यालय तसेच आष्टा येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांवर होणार आहे. दुपारी 12 ते 1.15 या वेळेत परीक्षा होणार आहे.
परीक्षा पारदर्शी, भरारी पथके नेमणार
सांगली जिल्हा बॅँकेत शिपाईपदासाठी रविवारी (दि. 6) होणाऱया लेखी परीक्षेसाठी 70 गुणांचा पेपर असणार आहे. परीक्षा पारदर्शी होणार असून, उमेदवारांनी आमिषाला बळी न पडता अभ्यास करावा. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाहीत याची पूर्ण दक्षता संबंधित कंपनी व बॅँकेने घेतली आहे. जिल्हा बॅँकेच्या अधिकाऱयांची भरारी पथके नेमण्यात येणार आहेत. गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.


























































