‘बेस्ट’ पगारवाढ! बेस्ट कामगार सेनेच्या लढ्यानंतर ऐतिहासिक निर्णय; प्रस्ताव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली बेस्ट कृती समितीने जून महिन्यात पुकारलेल्या यशस्वी संपामुळे बेस्ट उपक्रमातील 38 हजार 200 हून अधिक कर्मचाऱ्यांची घसघशीत पगारवाढ होणार आहे. गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत वेतनवाढ कराराच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. बेस्ट कामगार सेनेच्या लढय़ानंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्यामुळे बेस्ट उपक्रमातील कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बेस्ट कृती समितीच्या आंदोलनानंतर प्रशासन आणि सरकार पातळीवर कार्यवाहीला गती मिळाली. बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या तत्परतेने सोडवण्यासाठी सरकारने नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित केली. या समितीच्या निर्देशानुसार तसेच बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने सर्व कोष प्रस्ताव गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखालील बेस्ट समितीच्या बैठकीत शिवसेनेचे समिती सदस्य नितीन नांदगावकर, सुनील मोरे, सचिन पाटील, सुनील अहिर, प्रवीणा मोरजकर यांनी वेतनवाढीच्या कराराबाबत आग्रही भूमिका मांडली.

बेस्ट कामगार सेना कामगारांच्या पाठीशी

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी बेस्ट कामगार सेनेने वेळोवेळी आग्रही भूमिका घेतली. त्याच भूमिकेला अनुसरून संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक गौरीशंकर खोत, सरचिटणीस नितीन नांदगावकर, उमेश सारंग यांच्या पुढाकाराने जूनमध्ये यशस्वी संप आंदोलन करण्यात आले. त्याला यश येत असल्यामुळे कामगारवर्गामध्ये समाधानाची प्रतिक्रिया उमटली आहे.