
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहर पदाधिकाऱयांनी केलेल्या मागणीची दखल सातारा व रायगड जिल्हा प्रशासनाने घेत पोलादपूर मार्गावरील महत्त्वाचा आणि दळणवळणाचा मुख्य दुवा असलेल्या ऐतिहासिक आंबेनळी घाटातून अखेर आजपासून एसटी बस वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सलग दोन महिने बंद असलेली एसटी सेवा पूर्ववत सुरू झाल्याने महाबळेश्वर, पोलादपूर आणि संपूर्ण घाट परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व कर्मचाऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासूनच आंबेनळी घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यातच घाटात सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामांमुळे डोंगररांगांमधून मोठय़ा प्रमाणावर दरडी कोसळून वाहतूक विस्कळीत होत होती. घाटातील कठीण भौगोलिक परिस्थिती आणि प्रवाशांच्या जीवाचा धोका लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सलग दोन महिने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद ठेवली होती.
मागील काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला आणि परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली. तरीही या मार्गावरून एसटी महामंडळाची वाहतूक सुरू नव्हती. यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख महेश गुजर यांच्यासह पदाधिकाऱयांनी वाडा कुंभरोशीच्या सरपंच कांचन सावंत यांनी रायगड आणि सातारा जिल्हा प्रशासनाकडे पोलादपूर-महाबळेश्वर बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले आणि मकरंद पाटील यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी घाटातील सुरक्षेची पाहणी केली आणि रायगड व सातारा या दोन्ही जिह्यांच्या प्रशासनाशी समन्वय साधल्यानंतर आंबेनळी घाटातून एसटी बस वाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.
आज सकाळपासूनच पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर एसटी बसच्या फेऱया सुरू झाल्या. दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ‘लाल परी’ घाटातून धावताना पाहून स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी तीक्र समाधान व्यक्त केले आहे.


























































