म्हाडाच्या 850 हून अधिक विजेत्यांनी घरे परत केली, घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश दराडे, मुंबई

नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या मुंबईतील 2,640 घरांच्या लॉटरीमधील तब्बल 850 ते 900 विजेत्यांनी घरे परत केली आहेत. घरांच्या किमती आवाक्याबाहेर असणे यामागचे मुख्य कारण आहे. एकीकडे मुंबईत हक्काचे घर मिळावे, या स्वप्नासाठी म्हाडाच्या सोडतीकडे लाखो नागरिक डोळे लावून बसले असताना दुसरीकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विजेत्यांनी घरे नाकारल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. विजेत्यांनी घरे नाकारल्यामुळे आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांच्या घराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

म्हाडाने विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई येथील 2,640 घरांची सोडत जाहीर केली होती. 6 ऑगस्टला सोडत पार पडल्यानंतर विजेत्यांना लॉटरीतील घर स्वीकारायचे की नाही यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिली. 850 हून अधिक विजेत्यांनी घरे नाकारली असून 50 ते 60 विजेत्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या विजेत्यांना 9 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

…म्हणून घरे नाकारली 

एकापेक्षा अधिक घरे लागणे, घरांच्या किमती आवाक्याबाहेर असणे, लोकेशन पसंत न पडणे, पैशांची जुळवाजुळव न होणे आदी कारणांमुळे विजेत्यांनी म्हाडाला घरे परत केली आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी मिळणार असून त्यानंतरच प्रत्यक्षात लॉटरीतील किती घरे शिल्लक राहतील हे समजणार आहे.

म्हाडाच्या या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145, अल्प उत्पन्न गटासाठी 856, मध्यम उत्पन्न गटासाठी 798 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 841 घरांचा समावेश होता. विक्रोळीतील अत्यल्प गटातील 86 घरांच्या किमती 50 लाखांच्या आसपास, तर येथीलच अल्प उत्पन्न गटातील 70 घरांच्या किमती 75 ते 85 लाख रुपयांदरम्यान होत्या. सोडतीत सर्वात कमी किमतीचे घर पीएमजीपी मानखुर्द येथे असून त्याची किंमत 29 लाख 37 हजार रुपये आहे, तर सर्वात महागडे घर ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमधील असून त्याची किंमत 6 कोटी 82 लाख रुपये आहे.