
गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरला बंदी घालण्याची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरूवारी हल्ला करण्यात आला. मीडियाशी बोलत असतानाच संतोष चव्हाण नावाच्या इसमाने त्यांना मारहाण केली. पोलिसांनी हल्लेखोर चव्हाण याला अटक केली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या व्यक्तीने मत व्यक्त केले तर त्यांच्यावर अशापद्धतीने हल्ला करणे म्हणजे लोकशाहीवर, मूलभूत अधिकारावर हा हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले.
शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना विद्यानंद बापट यांच्या मुद्द्यांचे समर्थन केले. मी विद्यानंद बापट यांना ओळखत नाही. पण त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो योग्य असल्याचे शरद पवार म्हणाले. प्रत्येक सण हा सुखद आणि लोकांना आनंद देणारा असावा. हे सगळे डीजेचे आवाज तसेच रस्त्यांवरील कार्यक्रम यामुळे त्या सणाचं गांभीर्य कमी होते, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडले.
बापट यांच्यावरील हल्ल्याचा मी निषेध करतो. गणेशोत्सवाची परंपरा आहे. आणि जर कोणी यासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं तर त्याच्यावर हल्ला करणं म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात जास्त लक्ष देण्याची गरज आहे. असे हल्ले थांबले पाहिजेत, नाहीतर सक्तीचे धोरण स्वीकारले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
पुण्यातील ‘डीजेवाले बाबू’ विद्यानंद बापटांवर हल्ला, कायदा आणि सुव्यवस्थेचा बॅण्ड वाजला



























































