
शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामार्फत बीड जिल्हातील ३९६ बुथप्रमुखांना विमा पॉलिसी व ओळखपत्राचे वाटप कार्यक्रमावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एसआयआरवरून भाजपचा आणि नावाचा दुरुपयोग करणाऱ्या गद्दारांचा खरपूस समाचार घेतला. आताच्या एसआयआरमध्ये दोन कोटी मतदार वगळले गेले, हे दोन कोटी मतदार कुठे वगळले गेले? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सतत सतर्क राहण्याचे आदेश दिले.
नेमकं कसं कौतुक करायचं तुमचं? पण अंबादास दानवे तुमचं आणि आपल्या सर्व शिवसैनिकांचं, आपले जिल्हाप्रमुख आहेत, सगळेच… यांचं मनापासून मी कौतुक करतो. आणि हे कौतुक करायला दोन-तीन गोष्टी आहेत. एकतर हा बीड विधानसभा मतदारसंघ आहे. म्हणजे एका विधानसभा मतदारसंघातले तुम्ही बीएलए आहात. आणि तुम्ही बऱ्याच गोष्टीत एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. एकतर सगळे बीएलए तुम्ही नेमलेत याबद्दल तुमचं कौतुक आणि अभिनंदन आहे. पूर्वी शिवसेनाप्रमुखांनी एक सुरुवात केली होती ज्याचा उल्लेख आपण केला. अनिल देसाई आणि आपल्या स्थानिय लोकाधिकारच्या सर्व मंडळींनी ‘कार्यकर्त्याचा विमा’ यासाठी पुढाकार घेतला होता. कारण कार्यकर्ता म्हटल्यानंतर स्वतःचं घरदार कुटुंबं काहीही न पाहता जनतेसाठी झोकून देऊन काम करत असतो. जसं शहरं हा वेगळा भाग आहे पण ग्रामीण भागात उन्हातान्हामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये तो वणवण फिरत असतो. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून तो संघटनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत असताना कुठे काही घडलं तर कुटुंब वाऱ्यावर पडू नये ही एक शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती. त्यानुसार तेव्हा काम करायला सुरुवात झाली होती, मध्ये खंड पडला. पण तीच योजना तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने पुन्हा सुरू केलीय म्हणून तुमचं कौतुक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बीड म्हटल्यानंतर साहजिकच आहे त्यावेळेला आपली युती होती आणि युती म्हटल्यानंतर गोपीनाथ मुंडेंचा तुम्ही उल्लेख केला. एक आपले कौटुंबिक त्यांच्याशी ऋणाणुबंध होते. शिवसेना आणि भाजप ही तेव्हाची युती ही फार वेगळी होती. आता सारखी नाहीये. आणि म्हणून त्यांच्या प्रेमाखातर बीड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा जागा या त्यांना आपण सोडत गेलो. त्याचा दुष्परिणाम असा झाली की हळूहळू बीड जिल्ह्यातील आपलं अस्तित्व हे कमी होत गेलं. आता परत एकदा बीड जिल्हा भगवा करण्याची संधी आपल्याला आलेली आहे. आणि तुम्ही इथे जे फेटे घालून बसलेला आहात त्यातनं मला भविष्यमध्ये हा संपूर्ण जिल्हा भगवा झाल्याचं आजच दिसतंय, असे कौतुक उद्धव ठाकरे यांनी केले.
आता जो उल्लेख केला की, ही योजना आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावानेच ती रजिस्टर झालीय आणि त्या नावानेच ती मिळेल. हा काही बांधून ठेवण्याचा प्रयत्न नाही. पण नावाचा दुरुपयोग करणारे बरेच आहेत. त्यांचा समाचार घेत चाललेलोच आहोत आणि लवकर त्याचा निकाल लागेल. याची मला खात्री आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. आज बीएलए म्हणजे तुमच्यावरती जी जबाबदारी आहे ती फार महत्त्वाची आहे. कारण ज्या काही बातम्या आपण वाचतोय आणि पाहतोय भाजपा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन डावपेच खेळतेय आणि निवडणुका जिंकतेय. आता या निवडणुका जिंकण्यामध्ये त्यांनी काही तारतम्य ठेवलेलच नाही. काय वाट्टेल ते कर आणि सत्ता मिळव. पश्चिम बंगालमधले मतदार गाळले. तामिळनाडूमधले वगळले. आपल्याकडे दोन कोटीच्या वरती मतदार वगळले. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? ज्या लोकसभा निवडणुकीत आपण विजय मिळवला होता त्याच्यानंतरच्या साधरणतः सहा महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या, त्याच्यात आपल्याला पराभव पत्करावा लागला. आणि या बोगस मतदार नोंदणीबद्दल पहिल्यांदा जर का आवाज कोणी उठवला होता तर ते निर्मला सितारामण यांचे यजमान परकला प्रभाकर हे होतो. आपले अनेक उमेदवार जे पराभूत झाले होते ते मला येऊन सांगत होते. राजन विचारे आहेत, सगळेच जण की, साहेब आमच्याकडे बोगस नोंदणी आणि दुबार मतदान हे खूप झालं. आणि परकला प्रभाकर यांनी सांगितलं होतं की, लोकसभा ते विधानसभा या काळात ४५ लाख मतदार हे जास्तीचे नोंदले गेले. आता हे मतदार आले कुठून? सहा महिन्यांत ४५ लाख जास्त नोंदले गेले आणि आताच्या एसआयआरमध्ये दोन कोटी कापले गेले. मग हे दोन कोटी कुठे कापले गेले? प्रत्येकाला तुमची मतदार यादी पाठ असली पाहिजे. प्रत्येकाच्या २४ तास म्हणजे अगदी झोपताना खिशात घालून झोपा असं नाही पण एवढी ती तोंडपाठ पाहिजे. नुसती तोंडपाठ नाही तर प्रत्येक मतदार हा नाव आणि चेहऱ्याने तुम्हाला ओळखता आला पाहिजे. कारण दोन कोटी जिथे गाळले गेलेत याचा अर्थ कदाचित असा लावला तर तो चुकीचा होणार नाही की, पलिकडची लोक हे दोन कोटी हे उद्या जास्त घुसवू शकतील. कारण आता वगळले गेलेत. त्यांची खातरजमा केली आणि आता त्यांची नावं आली. कोणाला कळणार आहेत ते खरे आहेत खोटे आहेत? अशी शंका उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.
एक उदाहरण देतो. चार दिवसांपूर्वी माझ्याकडे खारघरचे शिवसैनिक आले होते. आपला एक कार्यकर्ता सहज काही कामासाठी झेरॉक्स मारायला दुकानात गेला. त्याला सांगितलं की, नाही आता खूप घाई आहे, एवढ्यात काही मिळणार नाही. पण त्याने बघितलं काय चाललंय एवढं काम? झेरॉक्स मशिन आता एवढी बिझी असं काय नवीन आलंय? तर तिथे एसआयआरच्या फॉर्मची झेरॉक्स सुरू होती. चार मशिनमध्ये सुरू होतं. म्हणजे मोदींनी काय रोजगार दिला? एसआयआरच्या बोगस फॉर्मची झेरॉक्स करा, हा रोजगार. आणि मग पकडलं त्यांना. पकडल्यानंतर कळलं की, ज्यांनी ते काम दिलं ते भाजपचे कार्यकर्ते होते. तिकडे बाचाबाची झाली. पोलीस तक्रार घ्यायला तयार नव्हते. एफआयआर घ्यायला तयार नव्हते. मग सगळे आपले लोक धावून गेले. प्रसाद भोईर, लिनाताई गरड गेल्या, सगळे शिवसैनिक गेले हटूनच बसले. शेवटी त्यांना रात्री उशिरा एफआयआर घ्यायला लागला. पुढे काय झालं माहिती नाही. आता सांगा की हा प्रकार तुमच्याकडे झालाच नसेल? असं खात्रीपूर्वक सांगताय तुम्ही? कारण आणखी एका ठिकाणी असं लक्षात आलं. पण तोपर्यंत ते गेले होते. तक्रार करून उपयोग नव्हता. तिकडे तर जबाबदार नेत्याच्या नावाने खोल्या बुक केल्या गेल्या होत्या. भाड्याने माणसं आणली गेली आणि तिथे त्यांच्याकडे खोल्यांमध्ये फॉर्म भरून घेऊन ते भरले गेले अशी एक बातमी आली. नागपूरला हे झालं, युवासेनेने उघडकीस आणलं. पण तोपर्यंत सगळं काम आटपून ते लोक पसार झाले होते. हे तुम्हाला आता लक्ष देऊन करायचं आहे. महाराष्ट्र पुन्हा भगवा करायचा आहे आणि शिवसेनामय तो करायचाच आहे. पहिले जी काय आपली घोषणा होती गाव तिथे शिवसेना शाखा आणि घर तिथे शिवसैनिक… आणि तो खरा आपला शिवसैनिक. गद्दारी करणारा शिवसैनिक असू शकत नाही. त्याला मी शिवसैनिक मानू शकत नाही. ती शहासेना आहे, शिवसेना नाही. त्याच्यामुळे शहा सेना आणि शिवसेनामधला फरक लक्षात घ्या. तुम्ही सगळे शिवसैनिक आहात. आपल्या डोक्यावरती भगवा आहे, आपल्या हातामध्ये भगवा आहे, हृदयात भगवा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
येत्या १७ तारखेला मी संभाजीनगरला येतोच आहे. मराठवाड्याचं जे आंदोलन तुम्ही करताय त्यासाठी मी स्वतः येणार आहे. १७ तारखेला आपण भेटतोच आहोत. पुन्हा दसऱ्याला आपण शिवाजी पार्कला भेटणारच आहोत. पण शिवसेना म्हटल्यानंतर सर्वसामान्यासाठी लढणारा शिवसैनिक हीच आपली ओळख आहे. आता मी मराठवाड्यात येतोय, का येतोय? आपण सत्तेत असताना जे निर्णय घेतले होते त्याचाही आढावा घ्या. ते पुढे कसे आडवले गेले त्याचाही आढावा घ्या. आणि हे नंतरचं जे काही चाललेलं आहे आणि आधी जे काही चाललं होतं, त्याचा आढावा घ्या. म्हणजे थोडक्यात की, आपण सत्ता आपल्याला पाहिजे म्हणतोय ती जनतेची सेवा अधिक प्रभावीपणाने करायला पाहिजे म्हणून आपण सत्ता पाहिजे म्हणतोय. आणि यांचं जे काही चाललेलं आहे ते नुसतं सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, पुढे काय? भ्रष्टाचार करणे म्हणजे काय सत्ता राबवणे असं नाही. जनतेची सेवा करणं म्हणजे जो गाडगेबाबांचा संदेश होता अन्न, वस्र, निवारा. मग रोजीरोटी आली. गाडगेबाबांची दशसुत्री आहे. ती देण्यासाठी आपल्याला अधिकार पाहिजे म्हणून आपल्याला सत्ता हवी आहे. सत्ता होती तेव्हा आपण जी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती आणि आताची आहे, याच्यात फरक आहे की नाही? चांगली वाईट तुम्ही ठरवा आणि सांगा कोणाचं सरकार चांगलं होतं? उघड कारभार आहे, यात लपवण्यासारखं काहीच नाही. आणि त्याच करता आपण एक जनतेच्या सेवेचं व्रत जे कंकण पाहिजे तर शिवबंध म्हणा जे हाती बांधलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याचं पावित्र्य जपा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
आपल्याला ही योजना राज्यभर न्यायची आहे. राजकीयदृष्ट्या जो जिल्हा आपण दुष्काळी समजत होतो तो जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही योजना करत असेल तर मग राज्यभर ही योजना का नाही करू शकत? त्या योजनेचे बारकावे तुम्ही द्या. आणि ही योजना आपण राज्यभर आपल्या शिवसैनिकांसाठी, बीएलएंसाठी कशी ती पुढे वाढवत न्यायची, ती पुढे वाढवत नेऊ. तुम्हाला खास धन्यवाद देतो की, तुम्ही एक उत्तम पाऊल या आपल्या क्षेत्रात टाकलेलं आहे. आणि कार्यकर्त्याची जबाबदारी, कार्यकर्त्याची काळजी कशी घ्यावी हे छान उदाहरण सर्वच राजकीय पक्षांसमोर तुम्ही ठेवलेलं आहे. त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा अभिनंदन करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


























































