
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी, 6 सप्टेंबर 2026 रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यानच्या अप व डाऊन मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वेवर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत ब्लॉक असणार आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 या दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांवर थांबतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉकच्या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असेल. ट्रान्स-हार्बर लाईन आणि उरण पोर्ट मार्गावरील सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जातील.


























































