
फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-2379 विमानातील मुख्य वैमानिकाच्या ड्रग्ज चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) च्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. वैमानिकाच्या दोन्ही स्वतंत्र चाचण्यांमध्ये मादक पदार्थांची उपस्थिती आढळली असून दोन्ही चाचण्यांमध्ये गांजाच्या सेवनाची पुष्टी झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे एएआयबीने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने तातडीने कारवाई करण्याची करत वैमानिकाला निलंबित केले आहे.
4 ऑगस्ट रोजी फुकेतहून दिल्लीच्या दिशेने येत असताना हे विमान ओडिशाच्या हवाई क्षेत्रातून जात होते. हे विमान अचानक 36 हजार फूट उंचीवरून काही क्षणांत 300 फुटांपर्यंत खाली आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या अचानक झालेल्या उंचीतील बदलामुळे विमानातील 24 प्रवाशी जखमी झाले होते. कोणाचे नाक फुटले होते, तर कोणाचा खांदा निखळला होता. काहींचे डोकेही फुटले होते. दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर मुख्य वैमानिकाची ड्रग्ज चाचणी करण्यात आली होती. पहिल्या चाचणीत वैमानिक पॉझिटिव्ह आढळला होता. दुसऱ्या चाचणीचा निकालही त्याच प्रकारचा आला आहे. एएआयबीने या घटनेला गंभीर बाब मानले आहे. विमानाच्या अचानक झालेल्या या उंचीतील बदलामागे नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत होती, याचा तपास सुरू आहे.
प्रवासी सुरक्षेला प्राधान्य
एएआयबीच्या प्राथमिक अहवालावर एअर इंडियानेही प्रतिक्रिया दिली आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हेच एअर इंडियाचे काम आहे. एअरलाइनने अहवालाची दखल घेतली असून तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले जात आहे. तपासासाठी आवश्यक असलेल्या ऑपरेशनल, देखभाल आणि तांत्रिक नोंदी एअर इंडियाकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

























































