
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि आशियाई क्रीडाविश्वावर आपली पकड घट्ट करणाऱ्या कबड्डीने आता ऑलिम्पिकच्या दिशेने जोरदार चढाई केली आहे. आगामी २०३६ च्या ऑलिम्पिकमध्ये कबड्डीला स्थान मिळवून देण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नांना बळ देताना आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने (आयकेएफ) आपल्या विशेष सर्वसाधारण वार्षिक सभेत (एसजीएम) आफ्रिका आणि युरोपातील नव्या राष्ट्रीय संघटनांना सदस्यत्व देण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. या विस्तारामुळे लवकरच आयकेएफची सदस्यसंख्या सुमारे ८० देशांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्राच्या कबड्डीचे ‘मिशन ऑलिम्पिक’कडे पाऊल
हिंदुस्तानात कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घाम गाळणाऱ्या महाराष्ट्राच्या या रांगड्या खेळाची जागतिक झेप आता अधिक व्यापक होत आहे. प्रो कबड्डीच्या निमित्ताने मराठमोळी कबड्डी आतापर्यंत आशियातील १५ देशांसह एकूण २५ देशांपर्यंत पोहोचली होती. मात्र २०३६ च्या ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी प्रयत्न करत असलेल्या हिंदुस्थानच्या दृष्टीने कबड्डीचा जागतिक विस्तार आणखी व्यापक होणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने हैदराबादमधील दोनदिवसीय विशेष एसजीएममधील आजची घडामोडी महत्त्वाची मानली जात आहे. आफ्रिका, युरोप आणि अन्य भागातील नव्या राष्ट्रीय कबड्डी संघटनांना औपचारिक संलग्नता देण्यात आली आहे.
आफ्रिका-युरोपची ताकद कबड्डीच्या पाठीशी
‘मिशन ऑलिम्पिक’च्या दिशेने टाकलेल्या या पावलासाठी हैदराबादमध्ये झालेल्या आयकेएफच्या एसजीएममध्ये आफ्रिक खंडातील २० देशांचे प्रतिनिधी आफ्रिकन कबड्डी महासंघाचे अध्यक्ष डॉ. ओसामा सईद यांच्या नेतृत्वाखाली, तर युरोपातील १६ देशांचे प्रतिनिधी युरोपियन कबड्डी महासंघाचे प्रमुख दलवीर संधू यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने नव्या देशांचा कबड्डीच्या आंतरराष्ट्रीय प्रवाहात प्रवेश होणे हा या खेळाच्या जागतिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कबड्डीच्या ऑलिम्पिक स्वप्नाला बळ!
पुरुषांची कबड्डी ऑलिम्पिकमध्ये विचारात घेतली जाण्यासाठी किमान ७५ देशांमध्ये आणि चार खंडांत, तर महिलांची कबड्डी ४० देशांमध्ये आणि तीन खंडांत खेळली जाने अपेक्षित आहे. त्यामुळे आयकेएफची सदस्यसंख्या ८० देशांपर्यंत नेण्याचा प्रयत्न कबड्डीच्या जागतिक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. मात्र, ८० देश आयकेएफचे सदस्य झाले म्हणजे ऑलिम्पिक प्रवेश निश्चित होत नाही. त्या देशांमध्ये कबड्डी प्रत्यक्षात किती व्यापकपणे खेळली जाते आणि स्पर्धात्मक व्यवस्था किती मजबूत आहे यालाही महत्त्व आहे. यजमान देशाला अतिरिक्त खेळाचा प्रस्ताव मांडण्याची संधी असते. अंतिम निर्णय आयओसीचा असतो.
नव्या देशांना सर्वतोपरी पाठबळ
आफ्रिका आणि युरोपातील या नव्या देशांच्या सहभागामुळे कबड्डीचा नकाशा आता आशियापुरता मर्यादित राहणार नाही. नव्या राष्ट्रांमध्ये प्रशिक्षण, पंच-तांत्रिक विकास, राष्ट्रीय स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा विस्तार झाला, तर कबड्डीची जागतिक व्याप्ती आणि ऑलिम्पिकसाठीची दावेदारी आणखी भक्कम होऊ शकते. यासाठी हिंदुस्थानच्या सहकार्याने आयकेएफ सर्व नव्या सदस्यांना कबड्डीच्या तंत्रापासून आर्थिक मदतीपर्यंत सर्वतोपरी पाठबळ देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
जुन्यांना डच्चू; नव्या दमाची कार्यकारिणी
आयकेएफच्या एसजीएममध्ये जुन्या कार्यकारिणीतील संचालक तेजस्वी गेहलोत आणि अध्यक्ष विनोद तिवारी यांना पदावरून हटवून ‘मिशन ऑलिम्पिक’साठी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ज्ञानेश्वर कसानी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्च पदासह मुख्य संचालकपदी एकमताने निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे परमिंदर शर्मा, गोविंद शर्मा, अशोक दास, डॉ. ओसामा सईद आणि प्रशांत चतुर्वेदी या दिग्गजांचीही आयकेएफमध्ये वर्णी लागली आहे. मात्र, मलेशियाचे सदाशिव सुंदरम यांच्याकडे सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले आहे.
-
आयकेएफचे आधीचे सदस्य देश : हिंदुस्थान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, चीन, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, कझाकस्तान, कोरिया, मलेशिया, नेपाळ, ओमान, थायलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, इटली, डेन्मार्क, नेदरलँड्स, स्वीडन, केनिया, युगांडा, सेनेगल, अमेरिका, अर्जेंटिना.
-
नवे सदस्य देश : अल्जेरिया, अंगोला, ऑस्ट्रिया, बहरीन, बल्गेरिया, कॅमेरून, कॅनडा, केप व्हर्डे, काँगो-ब्राझाव्हिल, सायप्रस, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, इजिप्त, फ्रान्स, घाना, जर्मनी, आयर्लंड, इटली, केनिया, मादागास्कर, मॉरिशस, म्यानमार, नायजर, नॉर्वे, स्वित्झर्लंड, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, वेल्स, झांबिया.


























































