मुंबई शहर कबड्डीची एजीएम उरकाउरकीची? एजीएम तासाभरात संपवणार असल्याचे कबड्डी संघटकांचे भाकीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन वर्षांपूर्वी संघटनेचा कार्यकाळ संपूनही सत्ता भोगत असलेल्या मुंबई शहर कबड्डी संघटनेची अत्यंत महत्त्वाची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) रविवारी सकाळी 10 वाजता वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात पार पडणार आहे. या सभेत संघटनेची पंचवार्षिक निवडणुकीचा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यातच निवडणुका केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यांतर्गत घेणे बंधनकारण असल्यामुळे संघटनेचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी निवडणूक लढवण्यास अपात्र होणार असल्यामुळे ही एजीएम वादळी ठरण्याची शक्यता आहे. मात्र नेहमीप्रमाणे एजीएम तासाभरात उरकण्याची ‘भाईगिरी’ यंदाही दिसेल, असा विश्वास कबड्डीच्या खऱया समर्थकांनी बोलून दाखवला आहे.

मुंबई शहर कबड्डी संघटनेचा सध्याचा कार्यकाळ हा बेकायदेशीर आहे. तीन वर्षांपूर्वीच त्यांनी निवडणुका घेणे बंधनकारक होते, पण त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय संघटनांच्या निवडणुकांची कारणे पुढे करत सत्तेच्या चाव्या स्वतःकडेच ठेवत आपली मनमानी केल्याचे प्रामाणिक मत कबड्डीचे खरे समर्थक व्यक्त करत आहेत. बोगस संघ मोठय़ा संख्येने निर्माण करता यावेत म्हणून संघटनेच्या घटनेत बदल करण्याचा विषय कधीही मार्गी लागू शकलेला नाही. जे संघ दरवर्षी किमान एका स्पर्धेत खेळण्यासाठी मैदानात उतरतील आणि खेळतील त्यांनाच मतदानाचा अधिकार राहिल असा साधा नियम  ठेवून बोगस संघनिर्मितीला बळ दिले आहे. संघांकडून या नियमांचेही सरसकट उल्लंघन केले जात असतानाही संघटना आपल्या मतांसाठी बोगस संघांना मतदानाचा अधिकार बहाल करून आपला विजय आधीच निश्चित करत असल्याची माहिती जाणकार देत आहेत.

एजीएममध्ये निवडणुकीसह बोगस संघांवर आळा घालून खऱया संघांना कसे न्याय देता येईल, संघांच्या नव्या घटनेत कोणते बदल अपेक्षित आहे, अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर एजीएममध्ये चर्चा करण्याची सर्वांना संधी असते, पण या सभेत सत्ताधाऱयांचीच भाईगिरी चालते. त्यामुळे किती प्रश्न असले तरी ही एजीएम तासाभरात उरकली जाणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जर सत्ताधाऱयांना स्वतःच्या खुर्चीपेक्षा कबड्डीची काळजी असेल तर ते सभेत सर्वांचे मत जाणून घेण्याचे प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.