
बंगळुरूत कर्जाच्या व्याजाची रक्कम न भरल्याच्या कारणावरून एका महिलेचे अपहरण करून तिला विवस्त्र करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी महिलेचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी रेश्मा बानू, नाजथ आणि रेश्माचा पती सुहेल या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
इंडिया टुडेने दिेलेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेने सुमारे दोन वर्षांपूर्वी रेश्मा बानूकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यानंतर तिने रेश्मामार्फत नाजथकडून आणखी 50 हजार रुपये घेतले. आर्थिक अडचणींमुळे महिलेने सुमारे सहा महिन्यांपासून व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. तसेच दोन महिन्यांपासून कर्जाचे हप्तेही थकले होते. यानंतर तिने रेश्माचा फोन नंबर ब्लॉक करून आईच्या घरी राहण्यास सुरुवात केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला पैसे परत करत नसल्याचे लक्षात येताच नाजथने महिलेला काम देण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी बोलावले. ती तेथे पोहोचल्यानंतर रेश्मा बानू आणि तिचा पती सुहेल तेथे आले आणि त्यांनी तिच्यावर हल्ला केला. आरोपींनी चाकूने हल्ला करून महिलेला जबरदस्तीने ऑटोरिक्षातून कुंबलगोडूजवळील एका घरात नेले. तेथे तिला डांबून ठेवून मारहाण करण्यात आली. तसेच तिला विवस्त्र करून तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि पैसे परत न केल्यास व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देण्यात आली.
दरम्यान, आपली मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या आईने चंद्रा लेआउट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करून महिलेचा शोध घेतला आणि तिला आरोपींच्या ताब्यातून सुरक्षितपणे सोडवले. या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून अपहरण, मारहाण, धमकी आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील संपूर्ण परिस्थितीचा तसेच आरोपींच्या भूमिकेचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




























































