शाळा, कॉलेजच्या आवारात पानटपरी दिसली तर खबरदार, नवी मुंबई पालिका आयुक्तांची प्रशासनाला तंबी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता वाढू नये यासाठी शहरातील सर्वच शाळा आणि महाविद्यालयांच्या ५० मीटर परिघात पानटपरी दिसली तर याद राखा, अशी तंबी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रशासनाला दिली आहे. अशा पानटपऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सध्या विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. महाविद्यालयांच्या आवारात जर पानटपरी दिसली तर धडक कारवाई करण्यात यावी. ही कारवाई करताना पोलिसांना शाळेच्या मुख्याध्यापकांनी सहकार्य करावे, असेही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ उपायुक्त डॉ. अमोल पालवे, संजय शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदेश नाईक, पोलीस निरीक्षक थिटे आणि सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर रात्रीही कारवाई करा

महापालिकेकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर दिवसा कारवाई केली जाते. मात्र सायंकाळनंतर अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहून मध्यरात्रीपर्यंत व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रात्रीच्या कारवाईसाठी स्वतंत्र पथके तयार करून मोहीम सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.