
संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली. जन्माष्टमीच्या रात्री एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला असून, मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबरच्या रात्री संबंधित मुलगी जन्माष्टमीनिमित्त मंदिरात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. त्याच वेळी गावातील समीर नावाच्या तरुणाने आपल्या दोन साथीदारांसह तिला जबरदस्तीने समीरच्या घरी नेले. यानंतर समीरने पीडितेवर अत्याचार केला. बराच वेळ मुलगी घरी परतली नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना ती आरोपीच्या घरात अस्वस्थ अवस्थेत आढळून आली. त्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.
घटनेनंतर तीनही संशयित फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिल्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कारवाई करत समीरला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, फरार असलेल्या इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर योग साधना आश्रमाचे महंत स्वामी यशवीर महाराज यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आरोपींविरोधात कठोर पावले उचलण्याची तसेच त्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

























































