स्वतःचे अपयश लपवण्यासाठी विरोधकांवर टीका; पंतप्रधानांच्या भाषणावर मल्लिकार्जुन खर्गे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील श्रीराम कॉलेजच्या शताब्दी महोत्सवात पंतप्रदान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांवर टीका करणारे भाषण केले, मोदींच्या भाषणावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांच्या भविष्यावर आणि शिक्षणावर संवाद साधण्याऐवजी आपल्या भाषणाचा वापर केवळ राजकीय प्रचारासाठी केल्याचा गंभीर आरोप खर्गे यांनी केला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत मोदींवर निशाणा साधला. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचे प्रश्न दाबून टाकण्यासाठी आणि स्वतःच्या धोरणातील अपयश लपवण्यासाठी सरकारकडून सातत्याने नवनवीन विशेषणे वापरली जात असल्याचा दावा त्यांनी केला. खर्गे यांनी आपल्या टीकेमध्ये ‘नाराज फूफा’, ‘दिमागी नक्षलवाद’, ‘शहरी नक्षलवाद’, ‘खान मार्केट गँग’, ‘आंदोलनजीवी’ आणि ‘परजीवी’ यांसारख्या शब्दांचा उल्लेख करत, सरकारची विशेषणे बदलत असली तरी त्यांची जनविरोधी धोरणे कधीच बदलत नसल्याची टीका खर्गे यांनी केली.

पंतप्रधान जनतेपासून खूप दूर गेले असल्यामुळेच त्यांना अशा प्रकारे नागरिकांसोबत संपर्क करावा लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमात स्वतःचा ‘रिपोर्ट कार्ड’ सादर केला असला, तरी देशातील युवा वर्गही बेरोजगारी, वर्षानुवर्षे रखडलेल्या सरकारी नोकरभरत्या, पेपर लीकमुळे उद्ध्वस्त होत चाललेले भविष्य, महाग होत चाललेली शिक्षणव्यवस्था, कमी होत चाललेल्या शिष्यवृत्तीच्या संधी आणि विद्यापीठांच्या स्वायत्ततेवरील वाढता दबाव यांसारख्या समस्यांचे स्वतःचे ‘रिपोर्ट कार्ड’ हातात घेऊन उभा आहे, असा घणाघात त्यांनी केला.

#ChhatronKiGoonj विद्यार्थ्यांचा आवाज ऐका. केवळ इकडेतिकडे गोष्टी करण्याने किंवा भाषणबाजीनेतरुणांच्या समस्या सुटणार नाहीत, त्यामुळे सरकारनेतरुणांचा आवाज ऐकला पाहिजे, अशी मागणी खर्गे यांनी केली आहे.