
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मणिपूरमधील सर्व ६० विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदार यादी रविवारी निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. २०२६ च्या या अंतिम मतदार यादीनुसार राज्यातील एकूण मतदारांची संख्या १९ लाख ६० हजार ६२० इतकी झाली आहे. विशेष म्हणजे मणिपूरमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या लक्षणीयरीत्या अधिक असल्याचे समोर आले आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
नवीन यादीनुसार, राज्यात १० लाख ६ हजार ९६२ महिला मतदार, ९ लाख ५३ हजार ३५० पुरुष मतदार आणि ३०८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. राज्याचे लिंग गुणोत्तर पाहिले तर दर १००० पुरुषांमागे १०५६ महिला मतदार आहेत. तसेच १ जुलै २०२६ या अर्हता तारखेनुसार २० हजार ८१९ सेवा मतदारांचीही नोंद या यादीत करण्यात आली आहे.
मतदार यादी अद्ययावतीकरण प्रक्रियेची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, १८ मे २०२६ रोजी मसुदा प्रसिद्धीपूर्वी एकूण मतदारांची संख्या २० लाख ९३ हजार ०७६ होती. मात्र घरोघरी जाऊन केलेल्या पडताळणीनंतर ५ जुलै रोजी १९ लाख ३४ हजार ३९९ मतदारांची मसुदा यादी प्रसिद्ध करण्यात आली. या पडताळणी प्रक्रियेत गैरहजर, स्थलांतरित, मयत आणि दुबार नावे असलेल्या १ लाख ५८ हजार ६७७ मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यानंतर ५ जुलै ते ४ ऑगस्ट या काळात दावे आणि हरकती मागवण्यात आल्या. या काळात एकूण ९६ हजार ९८५ अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली, ज्यातून ५६ हजार ८७१ नवीन मतदारांची नोंदणी झाली आणि ३० हजार ६५० मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळण्यात आली.

























































