मोदी सरकारकडून इस्रोची भूमिका जाणीवपूर्वक मर्यादित करण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकार अंतराळ क्षेत्रात स्टार्टअप्स आणि खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) भूमिका जाणीवपूर्वक मर्यादित करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी रविवारी केला आहे. गेल्या अनेक दशकांच्या कठोर परिश्रमातून इस्रोने निर्माण केलेली क्षमता आता अशा खाजगी कंपन्यांकडे सोपवली जात आहे, ज्यांची देशाच्या अंतराळ कार्यक्रमाप्रती असलेली दीर्घकालीन कटिबद्धता संशयास्पद आहे, असे रमेश यांनी म्हटले आहे.

X वर एका वृत्तपत्राच्या बातमीचा संदर्भ देत जयराम रमेश यांनी आपला आक्षेप नोंदवला. अलीकडेच इस्रोच्या विविध केंद्रांमधील कर्मचारी संघटनांनी अवकाश विभाग सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांना पत्र लिहून सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाबाबत आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. या घडामोडींचा संदर्भ देत रमेश यांनी इस्रो समुदायातील अंतर्गत आवाजांचे कौतुक केले. याशिवाय नुकत्याच झालेल्या GSLV मोहिमेच्या यशामुळे इस्रोच्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावले असून टीकाकारांना चपराक बसल्याचेही ते म्हणाले.

“विक्रम साराभाई आणि सतीश धवन यांनी अत्यंत कुशलतेने उभारलेली ही संस्था जाणीवपूर्वक कमकुवत केली जात आहे. इस्रोच्या एका माजी अध्यक्षांनी आधीच या धोरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आता त्यांच्यासारख्या इतर दिग्गजांनीही गप्प न बसता आपल्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे,” असे आवाहन रमेश यांनी केले.