सरकारकडून दाखवला जाणारा GDPचा आकडा खोट, बेरोजगारी आणि महागाईवरून अखिलेश यादव यांचा केंद्रावर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि मोडकळीस आलेली नागरी पायाभूत सुविधा पाहता, सरकारकडून दाखवला जाणारा जीडीपी वाढीचा आकडा वास्तविकतेच्या पूर्णपणे विपरीत आहे, अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी केली. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधताना त्यांनी देशाच्या आर्थिक दाव्यांच्या विश्वासार्हतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आर्थिक आकडेवारीतून सामान्य नागरिकांचे खरे जीवन प्रतिबिंबित झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

अखिलेश यादव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, जीडीपीचे आकडे कुणीही स्वतःच्या मर्जीने बदलू शकत नाही. आजकाल प्रत्येक गोष्ट डेटा आणि पुराव्यांवर आधारित असते. सध्या भविष्यातील जीडीपी किती वाढेल याचे केवळ अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र देशात जेव्हा प्रचंड बेरोजगारी आहे, नोकऱ्या उपलब्ध नाहीत, महागाई वाढली आहे आणि पेट्रोल-डिझेल इतके महाग झाले आहे की, त्यात भेसळ करावी लागत आहे. सरकारला अजूनही जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवता आलेले नाहीत. अशा परिस्थितीत सरकार जो जीडीपीचा आकडा दाखवत आहे, तो अजिबात खरा नाही. सध्याची आर्थिक कोंडी पाहता जीडीपीची वाढ शून्यावर असल्यासारखे वाटते. झिरो जीडीपी म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती किंवा बदल न होता परिस्थिती जैसे थे राहणे, असा टोलाही त्यांनी लगावला.

उत्तर प्रदेशातील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांच्या दुरवस्थेवर बोट ठेवत त्यांनी प्रशासकीय दुर्लक्षावरही कडाडून टीका केली. आपल्या बिधुना येथील भेटीचा संदर्भ देत यादव म्हणाले की, तिथे चार पदरी रस्त्याचे काम जिथे थांबले होते, तिथेच संपले असून ते पुढे वाढवले गेले नाही. रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले आहेत. रुग्णवाहिका सेवा आणि डायल १०० ही पोलिसांची आपत्कालीन सेवा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. पोलीस केवळ लोकांवर अन्याय करत असून त्यांना कुठून लुटता येईल, याच्याच शोधात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला.