
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांना मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी अतिरिक्त गाडय़ांची खूशखबर दिली. प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे कोकणासाठी 34 अतिरिक्त गणपती विशेष गाडय़ा चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगावदरम्यान 4 आरक्षित विशेष गाड्या, तर पनवेल आणि चिपळूणदरम्यान 30 अनारक्षित मेमू गाडय़ा धावणार आहेत. विशेष गाडय़ांचे आरक्षण मंगळवारी खुले होणार आहे.
मध्य रेल्वेने रविवारी गाडय़ांची घोषणा करतानाच वेळापत्रकही जाहीर केले. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडय़ांच्या 4 फेऱया चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 01003 विशेष गाडी 16 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 7.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.45 वाजता मडगाव येथे पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 01004 विशेष गाडी 15 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर रोजी मडगाव येथून सायंकाळी 4 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या विशेष गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबा असेल. गाडी क्रमांक 01003 साठीचे आरक्षण 8 सप्टेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
चिपळूणकरांना मोठा दिलासा
पनवेल आणि चिपळूण स्थानकांदरम्यान तब्बल 30 मेमू अनारक्षित विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 01159 मेमू अनारक्षित विशेष गाडी 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीत पनवेल येथून दुपारी 3.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.20 वाजता चिपळूण येथे पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 01160 गाडी 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीत चिपळूण येथून सकाळी 9 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.30 वाजता पनवेल येथे पोहोचेल. 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान या गाडय़ांची सेवा नसेल. या गाडय़ांमुळे चिपळूणपर्यंतच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.



























































