
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीवरून महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. परीक्षेचे पेपर फुटत नाहीत, तर विद्यार्थ्यांचे भविष्य पह्डले जातेय आणि पर्यायाने राज्याचे, देशाचे भविष्य फुटतेय; पण राज्यकर्त्यांना केवळ खोक्याशी मतलब आहे. आमदार, खासदार, नगरसेवक फुटतील का हेच ते पाहताहेत. पेपरफुटीची त्यांना चिंता नाही; कारण सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सरकार चालवताच येत नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘नीट’ प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला. आता एमपीएससीच्या गोंधळात नेमका कोणाचा राजीनामा घ्यायचा असा सवाल करतानाच, केवळ मंत्र्याचा राजीनामा पुरेसा नाही, व्यवस्थेतच सुधारणेची गरज आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासोबत परीक्षा यंत्रणा पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत आदी उपस्थित होते.
विवेकानंदचे कौतुक
आमदार फुटले की सुरत, गुवाहाटीला जातात, मग पेपर फुटल्यावर आम्ही कुठे जायचे, असा भेदक सवाल करणारा कोल्हापूरचा तरुण विवेकानंद याचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. ‘जे स्वतः फुटले त्यांना पेपरफुटीचे काय, अशा फुटक्या मनोवृत्तीचे लोक काय कारभार करणार, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी लगावली.
गैरवापर होऊ नये म्हणून धनुष्यबाण गोठवला पाहिजे
शिवसेना पक्ष व चिन्हाच्या सुनावणीवरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. ‘सगळे हातोडे शिवसेनेच्या डोक्यावर मारले जाताहेत,’ अशा शब्दांत त्यांनी खटल्याच्या विलंबावर नाराजी व्यक्त केली. ‘कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळायला हवे यासाठीच हा न्यायालयीन लढा सुरू आहे. चार वर्षे झाली. त्यात दोन मोठय़ा निवडणुका झाल्या. महापालिका झाली. अनेक जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. अंदाधुंद कारभार सुरू आहे. तारीख पे तारीख सुरू आहे. चिन्हाचा दुरुपयोग करून त्यांनी सत्ता मिळवली. इतरही बरेच गैरकारभार केलेत. त्याला पायबंद बसायला हवा म्हणून चिन्ह गोठवून टाका असे सिब्बल म्हणाले, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचा चोरी झालेला माल चोरासकट पकडला गेला आहे. न्यायालयाने या चोरांना चोरीचा माल वापरू देऊ नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यात निवडणूक आयोग भागीदार आहे का?
शिवसेनेची घटना आहे की नाही हे निवडणूक आयोग तपासते. पण गुजरातमध्ये सहा पक्ष बोगस निघाले. या पक्षांची 620 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची कार्यालये अहमदाबादच्या नरोडामध्ये आहेत. एवढी मालमत्ता जमा करणाऱ्या पक्षांची घटना निवडणूक आयोग बघतेय का, की त्या देणगीत आयोग भागीदार आहे असं म्हणायचं? काय चाललंय काय,’ असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
दैवतांच्या फोटोच्या जागी सरकारी माणसे नकोत
महापुरुषांच्या फोटोच्या बाजूला राजकीय नेत्यांचे फोटो लावण्यास उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘प्रोटोकॉल व दैवतांचा फोटो वेगळा असला पाहिजे. प्रोटोकॉलची माणसे बदलू शकतात. पदे मिळवण्यासाठी पक्ष बदलू शकतात, पण आम्ही दैवत बदलू शकत नाही. दैवताच्या जागी प्रोटोकॉलवाली माणसे नकोत. त्यांच्यासाठी वेगळी भिंत ठेवा.’
जरांगेंशी चर्चा का करत नाही?
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबतही उद्धव ठाकरे यांनी मत मांडले. जरांगेंशी नीट चर्चा का करत नाहीत, किती वर्षे त्यांच्या कोपराला गूळ लावताय? मध्यंतरी गुलाल उधळणारे कुठे गेले? तेव्हा तर दाढी गुलालाने लाल झाली होती. दाढीला गुलाल लावून आम्हीच केले, आम्हीच केले म्हणणारे आता गेले कुठे, का त्यांच्या दाढीत गुलाल अडकला आता, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला.
गणपतीत दंगली होण्याचा संशय
गणेशोत्सवाच्या काळात जातीय दंगली घडवल्या जातील असा नक्कीच संशय आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. लालबाग, परळ आणि माझगावमध्ये झालेल्या वादग्रस्त घटनांचा दाखला त्यांनी दिला. त्या घटना कुणी घडवल्या, कोणाला अटका झाल्या हे कुणाच माहीत नाही. ती लोपं कोण होती, कुठून आली, कुठे गेली हे सुद्धा माहीत नाहीत. त्यांचे पाठिराखे कोण, पुरस्कर्ते कोण आहेत हे शोधावे लागतील आणि त्यांना जनतेसमोर आणून शिक्षा करावी लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेने जात प्रमाणपत्रे दुकानातून घेतली नाहीत
विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याच्या मुद्दय़ावरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवसेनेचे नगरसेवक दणादण बाद केले जात असताना भाजप आणि शहासेनेच्या नगरसेवकांवरील केसेसचा निकाल का लागत नाही? शिवसेनेच्या नगरसेवकांनी जात प्रमाणपत्रे नाक्यावरच्या दुकानातून घेतली आणि भाजपवाल्यांनी निवडणूक आयोगाकडून घेतली असे तर नाही ना, असा सवाल त्यांनी केला. ही बेबंदशाही एकतर्फी चालली आहे. शिवसेनेचे नगरसेवक बाद करत असाल तर भाजपच्या ज्या नगरसेवकांवर आक्षेप आहेत तेसुद्धा बाद व्हायला हवेत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
देश म्हणजे फक्त गुजरात नाही
राष्ट्रीय स्पर्धा गुजरातमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, बोगस पक्ष नोंदवणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा करायची, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुंबईचे महत्त्व नेहमीच मारले जाते. वर्ल्ड कपची फायनल गुजरातमध्ये ठेवली जाते. देश म्हणजे केवळ गुजरात नाही. सर्व गुजराती लोकांना मी गुन्हेगार ठरवत नाही, पण गुजरात आणि देशामध्ये फूट पाडणाऱ्या भाजपपासून त्यांनी सावध राहावे, त्यांना जाब विचारावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली असे म्हणणारे मिंधे गोठलेल्या मनाचे आहेत. त्यांना गोठय़ामध्ये न्या असे म्हणणे नाही. कारण गोठय़ामधली जनावरेही माणसाच्या उपयोगी असतात. ही गोठल्या मनाची चोर मंडळी आहेत. त्यांना धनुष्यबाणावर बोलण्याचा अधिकार नाही.
लोकांना उत्सव हवाय, गोंगाट नको
गणेशोत्सवात डीजे बंदीबाबत सुरू असलेल्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी यावेळी महायुती सरकारला धारेवर धरले. लोकमान्यांनी स्वातंत्र्य चळवळीत अनेकांनी सहभागी व्हावे या उद्देशाने सणांची चळवळ केली, चळवळीचे रूपांतर उत्सवात झाले; पण उत्सवाचे रूपांतर गोंगाटात होता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी डीजे बंदीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. जनतेच्या आनंदासाठी उत्सव असावेत, त्रास देण्यासाठी नसावेत असे स्पष्ट मत व्यक्त करतानाच, डीजेबाबत सरकार गणेशोत्सव मंडळांशी चर्चा का करत नाही, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.































































