
छत्तीसगडमध्ये रीलसाठी एका महिलेने जे केले ते पाहून सर्वच हैराण झाले. रील पाहत असतानाच इंटरनेट बंद पडल्याने संतप्त महिलेने कीटकनाशक प्राशन केले. महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मंगलो बाई असे मयत महिलेचे नाव आहे.
छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. केराकचर गावातील मंगलो बाई ही मोबाईलवर रील पाहत होती. रील पाहत असताना इंटरनेट बंद पडल्याने ती संतापली. रागाच्या भरात तिने मोबाईल फोन फेकून दिला आणि नंतर एका खोलीत कोंडून घेतले. काही वेळाने महिलेची प्रकृती खालावली आणि तिला उलट्या होऊ लागल्या.
उलट्या होत असताना कीटकनाशकाचा तीव्र वास आल्याने कुटुंबीयांनी महिलेला तातडीने उपचारासाठी करताळा सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारांसाठी कोरबा जिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.

























































