लातूरच्या विकासाचा जाब जिल्हाधिकाऱ्यांसमोर, स्थानिकांना रोजगार देण्याची अंबादास दानवे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने सुरू असलेल्या ‘मराठवाड्याचा विकास… तुमसे ना हो पायेगा!’ या जनआंदोलनाच्या माध्यमातून बुधवार, 9 सप्टेंबर रोजी लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीला भेट देऊन पाहणी करण्यात आली. या प्रकल्पात स्थानिक युवकांना अपेक्षित रोजगार मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत लातूरच्या भूमीत उभारलेल्या प्रकल्पातील रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी केली.

रेल्वे कोच फॅक्टरीची संपूर्ण माहिती घेऊन उत्पादनाची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. कारखाना सुरू झाला असला तरी अपेक्षित क्षमतेने उत्पादन होत नसल्यास त्याचा स्थानिक रोजगार आणि औद्योगिक विकासाला अपेक्षित फायदा होणार नाही. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढवावी, प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावाव्यात आणि स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.

तसेच कारखान्यातील उच्च व वरिष्ठ पदांवर बाहेरील राज्यांतील व्यक्तींना संधी मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करून स्थानिक मराठी युवकांना रोजगार, प्रशिक्षण तसेच पात्रतेनुसार उच्च पदांवरही संधी देण्यात यावी, अशी मागणी संबंधित अधिकाऱ्यांसमोर करण्यात आली. जनआंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेल्या स्थानिक रोजगाराच्या प्रश्नाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यानंतर लातूर जिल्ह्यातील विविध रखडलेल्या विकासकामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन व चर्चा करण्यात आली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत उभी असली तरी डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याने आरोग्यसेवा सुरू होण्यास अडथळे, MIDCच्या विकासकामांना अपेक्षित गती नसणे, पाणीपुरवठा योजना अपूर्ण असणे, सिंचन प्रकल्प रखडलेले असणे तसेच लातूर–वर्धा रेल्वेमार्गाच्या कामाचा प्रश्न यांसह विविध मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले.

लातूरच्या विकासाचा अनुशेष दूर करून प्रलंबित प्रकल्पांना गती द्यावी आणि जनतेच्या हक्काचा विकास प्रत्यक्षात आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, दिलीप घुगे, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, पप्पु कुलकर्णी, बालाजी जाधव, बजरंग जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.