
अहिल्यानगर महापालिकेकडून सन 2016 ते 2020 या कालावधीत शहरात झालेली 776 रस्त्यांची निकृष्ट कामे, एकच काम नाव बदलून दोन किंवा अधिकवेळा दाखवून निधी लाटणे, कामे न करताच कागदोपत्री केल्याचे दाखवून गुणवत्तेचे खोटे, बनावट टेस्ट रिपोर्ट सादर करत कोटय़वधी रुपयांचा निधी हडपल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या खासगी फिर्याद अर्जावर सुनावणी करताना अहिल्यानगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी के. एम. सोनवणे यांनी तोफखाना पोलीस निरीक्षकांना तीस दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाने घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहे.
या प्रकरणात ऍड. राहुल पवार यांनी तक्रारदाराच्या वतीने जिल्हा न्यायालयासमोर केलेल्या युक्तिवादानंतर कोर्टाने आदेश दिला. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये ऍड. अभिजीत दरंदले यांनी युक्तिवाद केला होता. या कारवाईमुळे खासगी फिर्यादित नमूद महापालिकेतील तत्कालीन अधिकारी, ठेकेदारांसह 30 ते 40 संशयितांचे धाबे दणाणले आहे. या घोटाळ्यात कंत्राटदार आणि मनपा अधिकाऱयांनी संगनमत करून रस्त्यांच्या गुणवत्तेचे बनावट टेस्ट रिपोर्ट सादर करून कोटयवधी रुपयांची बिले मंजूर करून लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदार किरण काळे घोटाळ्याचा सन 2023 पासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यासाठी त्यांनी अनेकवेळा निवेदने दिली. काळे यांनी यापूर्वी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नगर विकास विभाग, राज्य शासनाकडे दाद मागितली होती. तसेच 12 जून 2026 रोजी तोफखाना पोलिसांत संशयित अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध फिर्याद दिली होती. परंतु पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे अखेर उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला.
चौकशी समितीच्या अहवालातून भांडाफोड
तक्रारदार किरण काळे यांना आरटीआयमधून प्राप्त झालेल्या दस्तऐवजांनुसार आणि शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगरच्या पाच सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालातून या घोटाळ्याचा भांडाफोड झाला आहे. किरण काळे यांच्या तक्रारीनंतर मनपाने शासकीय तंत्रनिकेतनकडे पडताळणीसाठी पाठवलेल्या एकूण 879 टेस्ट रिपोर्ट पैकी तब्बल 725 टेस्ट रिपोर्ट व 51 थर्ड पार्टी रिपोर्ट असे एकूण 776 रिपोर्ट हे शासकीय तंत्रनिकेतनने जारी केले नसल्याचे समोर आल्याने ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर रिपोर्ट शासकीय तंत्रनिकेतनचे बनावट लेटर हेड, बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून तयार केल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे.
दोन आयएएससह अनेक अधिकाऱयांवर संशय
या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी तथा मनपा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी, राजेंद्र भोसले या दोन आयएएस अधिकाऱयांसह तत्कालीन आयुक्त दिलीप गावडे, घनःश्याम मंगळे, श्रीकृष्ण भालसिंग, श्रीकांत मायकलवार, पंकज जावळे, विद्यमान आयुक्त यशवंत डांगे, शहर अभियंता ए. एन. पाटील, पी. एम. राजपूत, विजय सोनटक्के, सुरेश इथापे, श्रीकांत निंबाळकर, विद्यमान शहर अभियंता मनोज पारखे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, श्रीनिवास कुरे, मुख्य लेखाधिकारी दिनेश झिरपे, प्रवीण मानकर, एस. बी. तडवी, श्रीकांत अनारसे, चंद्रकांत खरात, प्रवीण मानकर, गणेश लयचेट्टी यांच्यासह 30 ते 40 अधिकाऱयांवर संशयाची सुई आहे.

























































