
मीरा भाईंदर येथील भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या ‘सेव्हन स्क्वेअर अकॅडमी’ या शाळेने अजब फतवा काढला आहे. शाळा व्यवस्थापनाने पर्युषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, बटाटा, लसूण, बीट आदी कंदमुळांच्या भाज्या आणण्यावर बंदी घातली आहे. शाळेच्या अॅपवरून विद्यार्थी आणि पालकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. या विषयावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले, अशी बंदी घालणाऱ्या शाळेला टाळं लावलं पाहिजे. धर्म तुमच्या घरात, शाळेपर्यंत धर्म येता कामा नये. प्राथमिक शाळेपर्यंत विशिष्ट धर्म आणत असाल तर, शाळेचे चालक मालक तुम्ही घरात बसा. अशी बंधनं लादली जात असतील तर हे लव्ह जिहाद पेक्षा भयंकर आहे. नरेंद्र मेहतांच्या या घटनेवर साधा कुणी निषेध तरी केलाय का? आता कुठे गेले धर्माभिमानी असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
यासंदर्भात अधिक बोलताना राऊत म्हणाले, विद्यार्थ्यांवर हा असा अन्याय करणारे तुम्ही कोण? तसेच ते म्हणाले, हे कशाकरता करताय तुम्ही? यातून तुम्ही काय दाखवताय? हे कठीण आहे. हे म्हणजे महाराष्ट्राला दिलेलं आव्हान आहे. महाराष्ट्राने काय खायचं हे तुम्ही कोण ठरवणारे? असा घणाघात यावेळी राऊतांनी केला. राऊत यांनी यावेळी बोलताना संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देखील दिला. ते म्हणाले, ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ असा तुकाराम महाराजांचा अभंग असताना कुणी काय खावं हे तुम्ही कोण ठरवणार? हे महाराष्ट्रात चालणार नाही असे यावेळी राऊत म्हणाले.
लोकसेवा आयोगच अकार्यक्षम आणि अपयशी!
राज्यातील एमपीएसी परीक्षांच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांकडून आंदोलन, मोर्चे सुरू आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, लोकसेवा आयोगच अकार्यक्षम आणि अपयशी आहे. राज्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं राजकारण सुरू आहे’. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एशियाटीक लायब्ररी भेटीवरून देखील त्यांनी निशाणा साधला. ‘उद्या या देशाचे महान विचारवंत अमित शहा एशियाटीक लायब्ररीमध्ये येताहेत. अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संस्थेमध्ये ज्यांनी हातात कधी पुस्तक घेतलं नाही ते पाहणी करण्यास येत आहेत’, असे म्हणत राऊतांनी शहा यांच्या भेटीवर भाष्य केले. एशियाटीक लायब्ररीची निवडणूक वाममार्गाने झाल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.





























































