
सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमे अंतर्गत बीड जिल्ह्यात आज अन्न आणि औषध विभागाच्या पथकाने धाडसत्र राबवले. वेगवेगळ्या तीन ठिकाणी धाडी टाकून मोठा माल हस्तगत केला. या कारवाईनंतर बीड जिल्ह्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने बीड जिल्ह्यात धाडसत्राची मोहिम हाती घेतली आहे. शहरातील बार्शीनाका परिसरामध्ये गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणारी स्कार्पिओ पकडण्यात आली. त्यात ३ लाख ६३ हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला तर, सात लाखाची स्कार्पिओही ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणात वाहनचालक आणि साथीदार दत्ता घोडके, ओमकार घोडके यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई माजलगावमध्ये करण्यात आला. यात क्वॉलिटी बेकरी नावाच्या दुकानात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. बेकरीमध्ये अस्वच्छता आणि आरोग्याला अपायकारक पदार्थ दिसून आले तर तिसरी कारवाई बीड शहरातील मोंढा भागात असणार्या कुशल ट्रेडिंगवर करण्यात आली. या तपासणीमध्ये खाद्य तेलाच्या रिपॅकिंगचा व्यवसाय उघडकीस आला. यात कोणत्याही तज्ञ व्यक्तींची नेमणूक केलेली नव्हती. तेल तपासणीसाठी लॅब नव्हती अशा त्रुटी त्या ठिकाणी आढळून आल्या. पाच तेलाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले आहेत. जवळपास ८०० किलो वजनाचा १४ लाख ७० हजार रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे आणि या दुकानाचा परवाना पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.





























































