एके दिवशी संपूर्ण चित्रपटच AI वर तयार होईल, राजकुमार हिरानींचे मनोरंजन विश्वातील तंत्रज्ञानावर वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर सध्या जगभरातील चित्रपट निर्मितीची समीकरणे बदलत असताना, बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. “भविष्यात असा एक दिवस नक्की येईल, जेव्हा संपूर्ण चित्रपट केवळ एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनेच तयार केला जाईल,” असे राजकुमार हिरानी म्हणाले आहेत. मात्र तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी मानवी भावना आणि प्रत्यक्ष कथा सांगण्याची कला यांची जागा कोणतीही यंत्रणा घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

मनोरंजन क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रभावावर बोलताना हिरानी म्हणाले की, चित्रपटसृष्टी सध्या एका मोठ्या तांत्रिक संक्रमणातून जात आहे. स्क्रिप्ट रायटिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, एडिटिंग ते संगीतापर्यंत आज सर्वच टप्प्यांवर एआयचा प्रभावी वापर सुरू झाला आहे. येत्या काळात हे तंत्रज्ञान इतके प्रगत होईल की, स्वतंत्रपणे संगणकावर संपूर्ण चित्रपटाची निर्मिती करणे सहज शक्य होईल. यामुळे नव्या पिढीतील तंत्रज्ञांना आणि लेखकांना मर्यादित बजेटमध्ये आपली कल्पकता मोठ्या पडद्यावर मांडण्याची अभूतपूर्व संधी मिळणार आहे.

तंत्रज्ञानाच्या या वेगाचे स्वागत करतानाच त्यांनी त्याच्या मर्यादांवरही बोट ठेवले. हिरानी म्हणाले, एआय हा केवळ एक अत्याधुनिक टूल म्हणून काम करू शकतो. चित्रपटाचा खरा आत्मा हा मानवी अनुभव, संवेदनशील विचार, अंतःप्रेरणा आणि भावनांशी जोडलेला असतो. एखादी कथा प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडवण्यासाठी दिग्दर्शकाची मूळ दृष्टी आणि मानवी दृष्टिकोनच अंतिम ठरतो. ते काम कोणतेही अल्गोरिदम स्वतःहून करू शकत नाही.