
अमेरिका आणि इराणमधील लष्करी संघर्ष पुन्हा एकदा चिघळल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून काहीशी शांत असलेली युद्धस्थिती पुन्हा भडकल्याने जागतिक तेल पुरवठ्यावर अनिश्चिततेचे ढग दाटले असून, कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 105 डॉलर्सवर पोहोचले आहेत. या दरवाढीमुळे जागतिक बाजारासह हिंदुस्थानवरही थेट आर्थिक परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कच्च्या तेलाच्या जागतिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या समुद्री मार्गावर निर्माण झालेल्या तणावामुळे बाजारात घबराट पसरली आहे. जगातील 20 टक्क्यांहून अधिक तेलाची वाहतूक याच मार्गावरून होते. हिंदुस्थान कच्च्या तेलाचा प्रमुख आयातदार देश असून देशातील बहुतांश कच्च्या तेलाची आयात याच सागरी मार्गाने केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कडाडल्यास त्याचा थेट फटका हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला बसतो.
दरम्यान घडामोडींचा परिणाम म्हणून चलन बाजारात डॉलर मजबूत झाला असून, हिंदुस्थानी रुपयात 0.2 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आणि रुपया प्रति डॉलर 95.30 या नीचांकी पातळीवर आला आहे. कच्च्या तेलाचे भाव वेगाने वाढल्याने हिंदुस्थानात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.



























































