
वारंवारच्या तांत्रिक बिघाडामुळे वर्षभर बंद असलेल्या ‘मोनोरेल’च्या पुनरागमनाबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. मोनोरेलच्या नवीन गाडय़ांसाठी आवश्यक सुरक्षा मंजुरी मिळाली असली तरी सुरक्षेच्या कारणास्तव मोनोरेलच्या सेवेची आणखी रखडपट्टी होणार आहे. मोनो मार्गिकेलगत संरक्षक जाळय़ा बसवण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण व्हायला काही महिने लागणार आहेत. त्यामुळे दिवाळी किंवा त्यानंतरच मोनोची सेवा सुरू होणार आहे.
दक्षिण मुंबईतील संत गाडगेबाबा महाराज चौक ते चेंबूरदरम्यान धावणाऱया मोनोरेलची सेवा 20 सप्टेंबर 2025 पासून बंद आहे. मोनोरेलच्या जुन्या गाडय़ांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत होते, तर प्रवाशांच्या अतिवजनामुळे दोनदा गाडी कलंडण्याची घटना घडली. त्यानंतर मोनोरेलची सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली होती. आता वर्ष उलटत असतानाही सुरक्षेचा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला आहे. संभाव्य अपघाताचा धोका कायम असल्यामुळे ‘महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन’ सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी मार्गिकांदरम्यान संरक्षक जाळय़ा बसवणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याची नवीन योजना याबाबत विचार करत आहे. उन्नत मार्गिकांच्या दरम्यान असलेल्या उघडय़ा जागेबाबत चिंता सतावत आहे. धावत्या ट्रेनमधून एखादी लहानशी वस्तू किंवा गाडीचा निखळलेला भाग खाली पडल्यास नागरिक, वाहने किंवा तेथील इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो, याअनुषंगाने मार्गिकेलगत संरक्षक जाळय़ा बसवण्याचा मुद्दा पुढे आला आहे. त्यासाठी आणखी काही महिने लागणार असल्याने मोनोची रखडपट्टी होणार आहे.
सुरक्षेच्या उपायांची सखोल पडताळणी
रेल्वे सुरक्षेच्या जुन्या तत्त्वाच्या आधारे नवीन पावले टाकली जात असल्याचे मेट्रो प्रशासनातील एका अधिकाऱयाने सांगितले. उन्नत रेल्वे मार्गिकेच्या खालच्या बाजूने संरक्षक जाळय़ा बसवाव्यात का? मोनोरेलच्या खांबांवर अतिरिक्त भार न टाकता आवरण बसवता येईल का? याची पडताळणी प्राधिकरणामार्फत केली जात आहे.
आयआयटी मुंबईचा ‘वॉकवे’ला विरोध
‘महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन’ने आयआयटी मुंबई आणि नवीन गाडय़ांचा पुरवठा करणाऱ्या ‘मेधा सर्वो ड्राइव्हज’कडून शिफारसी मागवल्या आहेत. आयआयटी मुंबईने मोनोरेल मार्गिकेच्या बाजूने कायमस्वरूपी चालण्याचा मार्ग (वॉकवे) बांधण्यास विरोध दर्शवला आहे.
































































