मुंबईतील कुटुंबावर पारनेरमध्ये काळाचा घाला, टेम्पोची मोटारीला धडक; चार ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मालवणी येथून मोटारीने अहिल्यानगरमधील नातेवाईकांच्या भेटीसाठी येत असलेल्या शेख कुटुंबीयांवर पहाटेच्या सुमारास अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील भाळवणी गावच्या शिवारात काळाने घाला घातला. हॉटेल संदीपसमोर आयशर टेम्पो आणि वॅगनआर मोटारीत झालेल्या भीषण अपघातात आई-वडील यांच्यासह मुलगा आणि मुलगी ठार झाले.

शकील मोहम्मद शेख (वय 45), सलमा शकील शेख (वय 42), इकबाल शकील शेख (वय 23) आणि सुमैय्या शकील शेख (वय 18, सर्व रा. गेट नं. 6, नुराणी मशिदीसमोर, मालवणी, मुंबई) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

शकील शेख हे कुटुंबासह वॅगनआर मोटारीतून मुंबईतील मालवणी येथून अहिल्यानगरकडे येत होते. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटार अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील भाळवणी शिवारात हॉटेल संदीपसमोर आली असता समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोने मोटारीला धडक दिली. यामध्ये मोटारीचा चक्काचूर झाला. कारमधील चौघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर शकील शेख, सलमा शेख, इकबाल शेख आणि सुमैय्या शेख या चौघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी अल्ताफ शब्बीर शेख (वय 52, रा. वाबळे कॉलनी, मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टेम्पोचालक धडक देऊन पसार

अपघातानंतर आयशर टेम्पोचालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अपघातग्रस्त कुटुंबाला मदत मिळण्यासही विलंब झाला. अपघाताची माहिती मिळताच पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फरार आयशर चालकाच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.

महामार्गावरील वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

भाळवणी परिसरातील या अपघातामुळे अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील सुरक्षितता आणि वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावर अवजड वाहनांची मोठी वाहतूक असते. भरधाव वेग, चालकांचा निष्काळजीपणा, रात्रीची कमी दृश्यमानता तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या सुरक्षेशी संबंधित त्रुटी यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याची नागरिकांची भावना आहे. त्यामुळे या मार्गावर वेगमर्यादेची प्रभावी अंमलबजावणी, अवजड वाहनांची तपासणी, धोकादायक ठिकाणी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था आणि नियमित वाहतूक नियंत्रणाची मागणी पुन्हा पुढे आली आहे.