
मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने यंदाच्या खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, मका इत्यादी पिकांना पावसाचा ताण पडला आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली असून, उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोयना धरण १०० टक्के भरले असले, तरी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी नदी, विहीर आणि बोअरवेलचा आधार घेत आहेत. तलावही पूर्ण भरलेले नसल्याने पाण्याची टंचाई भर पावसाळ्यातच जाणवू लागली आहे. सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने दुष्काळाची चाहूल लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
सांगली जिल्ह्यात खरिपाचे सरासरी पेरणी क्षेत्र २ लाख ४६ हजार ११८ हेक्टर आहे. खरीप हंगामासाठी ज्वारी, बाजरी, मका, भात, तूर, उडीद, मूग, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांसाठी बियाणांची मागणी केली होती. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत तूर, मूग आणि उडीद या पिकांचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले. पेरणीसाठी क्षेत्र तयार असूनही पावसाअभावी पेरण्या लांबल्या होत्या. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये दमदार पाऊस झाला. त्यानंतर जिल्ह्यात पेरण्यांना गती आली होती. सुमारे ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट मधील कमी पर्जन्यमानामुळे पश्चिम भागात भात, सोयाबीन, भुईमूग, मका, ज्वारी या पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार ओलाव्याचा ताण, वाढ खुंटणे व उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील विशेषतः जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांत ऑगस्टमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या भागातील मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांना पावसाचा ताण जाणवत आहे. पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरिपातील पिके सध्या काही भागांत अडचणीत आली आहेत. पिकांच्या वाढीसाठी पावसाची नितांत आवश्यकता असून, पुरेशा पाण्याअभावी पिकांवर ताण दिसून येत आहे, तर काही भागांत खरीप पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाचा खंड जसा वाढत जाईल, तसा खरीप पिकांच्या उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
गत महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही; परंतु जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिके जोमात उभी राहिली. ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरला. काही भागांत पाऊस होत असला तरी तो समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले. पिके सध्या फळधारणेच्या अवस्थेत असून, त्यांना पाण्याची गरज आहे.
ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
सांगली जिल्ह्यात जूनमध्ये पाऊस कमी राहिला. जुलैमध्ये सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस होऊन पेरण्यांना गती आली. मात्र, ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, पावसाचा खंडही मोठा राहिला. त्यामुळे खरीप पिकांवर परिणाम दिसून येत असून, उत्पादन घटण्याची भीती आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.




























































