
येमेनमध्ये इराण-समर्थित हुती बंडखोरांनी तांबड्या समुद्राला लागून असलेल्या संपूर्ण येमेनच्या किनारपट्टीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा केल्याने जगातील सागरी व्यापारासमोरील धोका आणखी वाढला आहे. मोचा, धुबाब आणि मायून या बेटांवर हुतींची उपस्थिती वाढल्याने बाब-अल-मंदेब या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवरील त्यांचा दबाव आणखीच वाढला आहे.
टीव्ही९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, हुती बंडखोर मोचानंतर आता धुबाबपर्यंत पोहोचले आहेत. तसेच बाब-अल-मंदेबच्या अगदी मध्यभागी असलेल्या मायून बेटावरही ते दाखल झाले आहेत. येथून बाब-अल-मंदेबच्या सागरी मार्गावर सहज पाळत ठेवणे शक्य आहे. मात्र हुतींच्या नेतृत्वाने बाब-अल-मंदेबवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.
बाब-अल-मंदेबचे काय आहे महत्त्व?
बाब-अल-मंदेब हे तांबड्या समुद्राचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार मानले जाते. ही सामुद्रधुनी एडनच्या आखाताला तांबड्या समुद्राशी जोडते आणि इथूनच युरोपचा मार्ग जातो. थोडक्यात सांगायचे तर आशिया, युरोप आणि मध्य पूर्वेदरम्यानच्या ऊर्जा आणि इतर मालवाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत हा मार्ग होर्मुजच्या सामुद्रधुनीला एक चांगला पर्याय म्हणूनही महत्त्वाचा मानला जात आहे.
सागरी मार्ग बंद होण्याचा धोका?
बाब-अल-मंदेबवर हुतींची पकड मजबूत झाल्याचा सरळ अर्थ असा होतो की, तांबड्या समुद्रातून जाणाऱ्या जहाजांवर दबाव आणण्याची त्यांची क्षमता वाढली आहे. याआधीही हुतींच्या हल्ल्यांमुळे या भागातील जहाजांच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. असे असले तरी, “आमच्याकडून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जहाजांना कोणताही धोका नाही आणि बाब-अल-मंदेबमध्ये वाहतूक सुरक्षित आहे,” असा दावा हुती नेते हाजेम अल-असद यांनी केला आहे.





























































