
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पेपरफुटीप्रकरणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र एसआयटी चौकशी नको तर न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी आज थेट राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्याकडे केली.
एमपीएससीच्या परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या मुद्दय़ांवरून आदित्य ठाकरे यांनी आज लोकभवन येथे राज्यपाल शर्मा यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणी सबळ पुरावे सादर केले. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना महायुती सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एमपीएससीच्या अध्यक्षांवर निशाणा साधला.
वर्षभरात 15-20 एसआयटी नेमल्या, एकाचाही अहवाल आलेला नाही
राज्य शासनाने एमपीएससी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. मात्र गेल्या वर्षभरात विविध प्रकरणांमध्ये चौकशीसाठी 15-20 एसआयटी नेमल्या गेल्या. त्यातील एकाचाही अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे न्यायालयीन चौकशीच झाली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांवर विश्वास नाही
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आठ दिवसांत पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनांवर विश्वास नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पोलिसांच्या घरांबद्दल आठ दिवसांत बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात दिले होते, मात्र सप्टेंबर उजाडला तरी त्यावर काहीच निर्णय झालेला नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
येत्या काळात मुंबईत मोठे आंदोलन
अन्याय होतोय म्हणूनच विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही, अन्यायाविरोधात शिवसेना उभी राहील, अशी ग्वाहीही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली. येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातून, प्रत्येक जिह्यातून आणि तालुक्यातून विद्यार्थी मुंबईत येऊन मोठे आंदोलन उभे करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई-गोवा महामार्गाबद्दल गडकरींना लाज वाटलीच पाहिजे
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही याची लाज वाटते असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. त्यावरही आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरी यांच्याकडे गेली 12 वर्षे महामार्ग खाते आहे. त्यामुळे त्यांना लाज वाटलीच पाहिजे, असे ते म्हणाले. आता मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणारे कंत्राटदार कोण होते, त्यांना किती दंड ठोठावला गेला आणि त्यांना देशभरात आणखी किती कामे मिळाली आहेत त्याची यादीही गडकरी आणि सरकारने जाहीर करावी, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.
एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, नाहीतर घ्यावा लागेल
एमपीएससी परीक्षांच्या पेपरफुटीप्रकरणी अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी तातडीने राजीनामा द्यावा नाहीतर घ्यावा लागेल, असा थेट इशाराच आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. आदित्य ठाकरे म्हणाले की, पेपरफुटीचे आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. आरोप करणारे विद्यार्थीही हवेत बोलत नाहीत. पहिल्या दोन परीक्षकांनी पेपर तपासले आणि गुण दिले नाहीत, मात्र तिसऱयाने कसे गुण दिले? एकाच टय़ुशन क्लासमधील आणि एकाच वर्गातील मुले पास कशी होतात? हे सर्व दलालांचे रॅकेट आहे.





























































