
मराठवाड्यामध्ये कोरडा दुष्काळ पडला आहे. पिकं जळून गेली आहेत. 60 दिवसांपेक्षा जास्त काळापासून पाण्याचा थेंब पडलेला नाही. दुसऱ्या बाजुला मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. लोकांच्या मनामध्ये खदखद आहे. एकीकडे अशी विदारक परिस्थिती असताना दुसरीकडे एक सरकार ब्रिक्समध्ये मॉकटेल पितंय, दुसरं सरकार लंडनच्या रस्त्यावर वडापाव खातंय आणि तिसऱ्या सरकारला महाराष्ट्रात काय चालू आहे त्या विषयी माहिती नाही. मग जनतेने दाद कुणाकडे मागायची, असा खरमरीत सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शनिवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले की, मराठवाड्याचे चित्र विदारक आहे. परवा बैलपोळा झाला, पण पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. काही दिवसांनी टँकर सुरू करावे लागतील अशी परिस्थिती आहे. 60 दिवस झाले पाण्याचा थेंब पडलेला नाही. दुसऱ्या बाजुला मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. या दोन्ही प्रश्नावर सरकार कोणतेही पाऊल उचलायला तयार नाही.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा देखील प्रश्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केलेली कर्जमाफी आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कर्जमाफी याच्यात जमीन आस्मानचा फरक आहे. काही गावात एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालेली नाही. पण सरकार ब्रिक्समध्ये, तर दुसरे लंडनमध्ये आहे. जनतेने दाद कुणाकडे मागायची, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
83 तालुक्यांमध्ये पाणी नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. मराठवाड्यात फार वाईट परिस्थिती आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही हीच परिस्थिती असून सरकार काय करतंय, कुठे आहे? तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना पाहणार आहात का? कोरडा दुष्काळ जाहीर करा. निदान गुरांच्या छावण्या सुरू करा. मुलांच्या शिक्षणाची फी माफ होईल आणि शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळेल असे पाहा. पण हे बिल्डरांचे कॉर्पोरेट सरकार असून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून यांना उद्योगपदी बिल्डरांच्या घशात घालायच्या आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
सरकार मेले आहे, दिसतोय तो फक्त सांगाडा! संजय राऊत यांचा घणाघात
एकनाथ शिंदे लंडनमध्ये काय करत आहेत याच्याशी महाराष्ट्राला काय पडलेले नाही. ते लंडनमध्ये वडापाव खाऊन फोटो काढत आहेत, त्यांना राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे काही पडलेले नाही. शेतकऱ्यांच्या चुली विझताहेत, एमपीएससी परीक्षेसंदर्भात तरुण रस्त्यावर आहेत, त्याच्यावर बोलण्याऐवजी तिकडून वडापाव काय दाखवता. इथे शेतकऱ्यांना प्यायला पेज मिळत नाही. पाणी नाही. आम्ही त्याबाबत बोलतोय. त्यामुळे ते लंडनला, पॅरीसला गेले काय किंवा डुप्लिकेट नोबल पुरस्कार मिळू द्या याचे कुणाला काही पडलेले नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले.




























































