बोलीभाषेची समृद्धी – कुणबी बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

कुणबी बोली ही महाराष्ट्रातील कुणबी समाजात बोलली जाणारी मराठी भाषेची एक महत्त्वाची लोकबोली आहे, जी भौगोलिक क्षेत्रानुसार वेगवेगळ्या रूपांत आढळते. कुणबी बोली संपूर्ण महाराष्ट्रात किंवा एकाच भागात सारखी नाही. ही बोलीभाषा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जसे की कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि ठाणे-पालघर परिसरात वेगवेगळ्या लहेजात बोलली जाते.

प्रदेशानुसार उच्चार आणि शब्दप्रयोगात थोडे बदल आढळतात. तसेच ती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी बोलली जात असली तरी त्या भाषेमध्ये येणारे विशिष्ट काही शब्द, गाणी, चाली-रीती, म्हणी, संदर्भ हे फक्त त्याचं बोलीभाषेमध्ये दिसून येत असून त्याद्वारे कुणबी समाजाची संस्कृती दिसते. या बोलीत शेतीविषयक शब्द, पारंपरिक लोकगीते आणि म्हणींचा समृद्ध वारसा आहे.

कोकणातील कुणबी समाजाच्या सामाजिक इतिहासात कुणबी भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र कुणबी बोली ही संज्ञा संपूर्ण कोकणात एकाच भाषिक स्वरूपासाठी वापरली जाते असे मानणे योग्य नाही.

‘कुन’ या शब्दाचा अर्थ लोक आणि ‘बी’ म्हणजे बियाणे; म्हणून कुणबी म्हणजे जे एका बीपासून अधिक बिया रुजवतात, अशी त्यांची ओळख सांगितली जाते. कुणबी म्हणजे शेती करणारा वर्ग किंवा समाज. हा समाज मुख्यत शेतीकामाशी निगडीत असल्याने कुणबी बोलीत मुख्यत शेती संबंधित शब्द व तशा स्वरूपाची वाक्यरचना जास्त दिसून येते. यामुळेच त्या त्या भागातील प्रादेशीक बोलीचा प्रभाव जाणवतो. जसे व्रहाडी आणि खानदेशी बोलीचा प्रभाव त्या-त्या भागातील कुणबी (उदा. तिरळे कुणबी, घाटोळे कुणबी) बोलीवर जाणवतो. याचप्रमाणे काही प्रमाणात आगरी बोलीतही प्रभाव दिसून येतो. समुद्रकिनाऱयालगत शेती करणाऱ्या कुणबी समाजात आगरी व कुणबी मिश्र बोली दिसून येते. आगर बोली ही आगरी (मीठ व भात उत्पादक), गवळी, कुणबी शेतकरी, तसेच कोळी, खारवी, भोई या दर्यावर्दी समाजाची बोली आहे. या अंतर्गत रायगड, ठाणे आणि महाड भागात कुणबी समाज आपापल्या स्थानिक उच्चारानुसार विशिष्ट शब्दरचना व लयीचा वापर करतो.

शेतीची कष्टाची कामे करताना किंवा पारंपरिक गाण्यांमध्ये श्रम कमी करण्यासाठी ही बोली लयबद्धतेने वापरली जाते.