
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
[email protected]
तळकोकणातील पिंगुळी गावातील गुढीपूरमध्ये कळसुत्री बाहुल्या आणि चित्रकथी या लोककलांमधून श्रीगणेशाचे दर्शन आणि संकीर्तन या लोककला सादर केल्या जातात. आजही ठाकर आदिवासी समाजातील कलावंत या लोकपरंपरेतून संस्कृती जपत आहेत.
गणेशाच्या आगमनापूर्वी कोकणवासीयांच्या आनंदाला उधाण येथे. मुंबईतला चाकरमानी मिळेल त्या साधनाने गाव गाठतो. कोकण प्रांताला लोककलेची वैविध्यपूर्ण देणगी लाभली आहे. शिमग्यातला संकासुर असो वा भगवंताचे दहा अवतार. या अपरांत भूमीने आपली लोककला प्राणपूर्वक जपली. गणेशोत्सव हादेखील कोकणवासीयांच्या उत्सवप्रिय जगण्याचे आणि असण्याचे एक महत्त्वाचे द्योतक. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिह्यातल्या कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील गुढीपूर मध्ये कळसुत्री बाहुल्या आणि चित्रकथी या लोककलांमधून श्रीगणेशाचे दर्शन आणि संकीर्तन ठाकर आदिवासी समाजातील कलावंत आपल्या लोकपरंपरेतून घडवितात. गंगावणे आणि मसगे अशी लोककलावंतांची दोन घराणी ही परंपरा आजही टिकवून आहेत.
वीणा, खुडुक (डमरूसदृश छोटे तालवाद्य) यांच्या साथीने कथाकथन करणारे चित्रकथी हे लोकसंस्कृतीचे उपासक असून त्यांची कथनशैली एखाद्या पुराणिकासारखी असते. चित्रकथीच्या पिंगुळी शैली आणि पैठणी शैली अशा दोन शैली अस्तित्वात असून पैठणी शैली कालौघात अस्तंगत होत असून पिंगुळी शैली मात्र ही मोजकी घराणी जपून आहेत. गणपत मसगे आणि परशुराम गंगावणे हे राष्ट्रीय कीर्तीचे दोन चित्रकथी कलावंत या परंपरेचे भारवही आहेत. चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांची परंपरा दशावताराच्या आधीची असल्याचा दावा परशुराम गंगावणे यांनी त्यांच्या मुलाखतीत केला आहे. चित्रकथी केवळ चित्रे दाखवून कथाकथनाचे काम करीत नाहीत, तर रामायण, महाभारत आणि पुराणे यातील पात्रांच्या बाहुल्या तयार करून या बाहुल्यांचे खेळ दाखवीत कथेचे कथन करीत असतात. त्यामुळे चित्रकथ्यांना ‘बाहुलेकार’ असेही म्हटले जाते. हे चित्रकथी ही चित्रे स्वतःच तयार करतात, रंगवितात आणि लोकांनी मागितल्यास ती त्यांना विकतातही, असे या आदिवासी ठाकर समाजातील कलावंत ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे यांनी सांगितले. जाधव, मोरे, पवार, साळुंखे ही त्यांची आडनावे. पालीचे कणीस, मोरपंख, सुरी, साळुंखीचा पंख ही त्यांची देवके असून त्यांची आडनावे या देवकांवरूनच पडलेली असल्याचे दिसते. पूर्वी चित्रकथाकथन हाच यांच्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता. मात्र या लोकांनी आता इतर व्यवसाय स्वीकारले आहेत.
चित्रकथीची कथनशैली निरूपण, संवाद, गायन अशा त्रिसूत्रीतून पुढे येते. त्यात सहजस्फूर्तता व उत्स्फूर्तता असते. रामायण, महाभारत, पुराण यातील कथा पदबंधातून सादर करताना ते एका पदबंधानंतर त्या पदबंधातील प्रसंगाचे निरूपण करतात. हे निरूपण करताना त्या प्रसंगातील पात्रांचे संवाद स्वतः सादर करतात व प्रसंगाचे कथन झाल्यावर पुन्हा पुढच्या पदबंधाचे गायन करतात. एकूणच चित्रकथ्यांची सादरीकरणाची ही पद्धती हरदासी कीर्तनासारखी असते. ग्रामपुरोहित हे कथेकरी होते. चित्रकथी हे लोकदीक्षित म्हणजेच कथेकरी म्हणून सर्वज्ञात आहेत. चित्रकथीची कथनशैली मराठी भाषेतून असते. पोथी वाचण्यासाठी ज्या पद्धतीने मांडी घालून बसतात तसाच चित्रकथी बसतो. पोथी बांधण्याची एक फळी असते. या फळीपुढे तो चित्रे ठेवतो. खांद्यावर वीणा, डाव्या हातात टाळ घेऊन तो उजव्या हाताने निरुपण करताना तो चित्रे बदलत असतो. दोन चित्रांच्या मधील प्रसंगांमध्ये तो एखाद्या अभंगाचे चरण लावून नीतिबोध करतो.
रिद्धी-सिद्धीसह गणेशाचे अवतरण, गणेशाचे वंदन, सरस्वतीचे आगमन, सरस्वतीकडून उपदेश आणि नंतर रामायण,महाभारतातील कथाकथन असे चित्रकथीचे स्वरूप असते. रिद्धी-सिद्धीसह गणेशाचे चित्र प्रारंभी फळीवर ठेवण्यात येते, तेव्हा चित्रकथी गायनाला सुरुवात करतो.
दे पायाची जोड। मोरया दे पायाची जोड। तुजवीण कवणा। शरण मी जावू।
नाम तुझे बहु गोड। मोरया दे पायाची जोड। नाना दुःखे भोगुनि सारी। विषयवासना सोड। दे पायाची जोड। मोरया दे पायाची जोड। हे पद गावून गणेशवंदना करतात. हळूहळू सादरीकरणात जिवंतपणा येत असतो आणि साक्षात देव गजानन रंगमंचावर आले आहेत असा भास चित्रकथी निर्माण करतात आणि मग चित्रकथी गणेशाची ओवी गायला सुरुवात करतो, देवा गौरीहरा, तुझे चरणी नमन माझे। मज मती आहे थोडी। परि दाविलीसी ज्ञानमार्गाची गोडी। ही ओवी सादर होत भक्त आणि गणेशामधील संवाद चित्रकथी निरूपणातून पुढे येते.
अशा पद्धतीने भक्त आणि देव यांतील संवाद चित्रकथी सादर करतात. लोकमानसाला लपेटून असलेल्या लोकसंस्कृतीने लोकपरंपरांचे वहन पिढी दर पिढी केले आहे. काही दिवसांतच विद्यादात्या गणेशाचे आगमन घरोघरी होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अलीकडची जरी असली तरी लोकसंस्कृतीतील गणेशोपासना ही प्राचीन आहे. हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास या परंपरेला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा केंद्रबिंदू म्हणजे महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव. हा गणेशोत्सव पारंपरिक व सांस्कृतिक पद्धतीने साजरा व्हावा हीच अपेक्षा.
(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)

























































