सोहळा – अडीचशे वर्षांचा गणराय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वप्नील साळसकर
[email protected]

कोकणातील गणेशोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने कौटुंबिक सोहळा. सावंत कुटुंबीयांनी गणपती उत्सवाचा 250 वर्षांचा पिढीजात वारसा जपत नात्यातील स्नेहबंधाचे महत्त्वच सांगितले आहे.

सिंधुदुर्गात कणकवली तालुक्यातील शिरवलमधील सावंत कुटुंबीयांनी 250 वर्षांचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा पिढीजात वारसा आजही जपला आहे. 36 कुटुंबीय एकत्रित येऊन हा सोहळा साजरा करत आहेत. पूजा, नैवेद्य, आरत्या, भजन, फुगडी असा सात दिवसांचा भक्तिमय माहोल शेकडो स्थानिक आणि चाकरमानांच्या उपस्थितीत पाहण्यासारखा आहे.

सावंत कुटुंबीयांच्या राजाची मूर्ती बनवण्याची प्रक्रिया साधारण जुलै महिन्यात सुरू होते. शाडूची माती आणल्यानंतर वरसलदार यांच्यामार्फत ती मळून घेतली जाते. मूर्तीची जडणघडण ही खऱया अर्थाने नागपंचमी सणापासून सुरू होते. एक ते दीड दशकापूर्वी मूर्तीला लागणारी माती हे शेतजमिनीतील असायची. परंतु मूर्ती तयार करताना खूप वेळ लागत होता म्हणून कालांतराने शाडू मातीचा वापर करण्यात येऊ लागला. शेतातील माती ही साधारण त्यावेळचे 12 गोळे म्हणजेच आताच्या बारा ते तेरा शाडू मातीच्या गोण्या लागत आहेत.

मूर्तीच्या बैठकीपासून ती तयार होईपर्यंत दहा ते पंधरा दिवसांचा कालखंड जातो. गणपतीची मूर्ती पाच ते सहा फुटाच्या दरम्यान असते. वरसलदार यांच्या सांगण्याप्रमाणे ही मूर्ती घडविली जाते. यात खरी कसरत मूर्तिकारांची असते आणि मग गणपती बाप्पा साकार होतात. सुमारे 2000 सालापासून मूर्ती घडविण्याचे काम येथील सुरेश मेस्त्राr करत आहेत. तत्पूर्वी घरातील बापू सावंत व अन्य मंडळी एकत्र येऊन मूर्ती घडविण्याचे काम करत असत.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापर्यंत ही मूर्ती घडविण्याची प्रक्रिया चालू असते. मूर्तीची रंगरंगोटी ही एक दिवस अगोदर रात्रीपासूनच होते. अगदी लहानथोर मंडळी आतुरतेने आपल्या बाप्पाचे रंगकाम बघण्यात पहाटेपर्यंत टक लावून असतात. एका बाजूला गणपतीच्या मंडपाला लागणारी सजावटीची हालचाल चालू असते. प्रत्येक जण अगदी उत्साहाने सर्व कामात मदत करतात. रंगीत दिव्यांची रोषणाई, फुलांची आरास आणि मंडपीची सजावट पाहण्यासारखी असते. पहाटेची अल्पावधीची झोप घेत सकाळी उत्साहाने गणेश पूजनाची लगबग सुरू होते. महिलावर्ग आपापल्या घरी नैवेद्य बनवण्यास व्यस्त होतात.

ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घडवलेली मूर्ती मुख्य ठिकाणी स्थानापन्न केली जाते. वजनदार असलेल्या या मूर्तीला उचलण्यासाठी जवळपास 50 ते 60 मंडळीचे बळ लागते. गणेशपूजा आटोपल्यानंतर दुपारी तीन वाजता सावंत कुटुंबीयांनी आपापल्या घरी शिजवलेल्या नैवेद्याची 36 ताटे एकाच वेळी बाप्पांसमोर ठेवत आरतीचा कार्यक्रम होतो. सायंकाळी घरातील मंडळीची सुस्वर भजने, महिलांचा पारंपरिक फुगडय़ांचा खेळ रंगतो. पुढील सहा दिवस कार्यक्रमांची अशीच रूपरेषा असते. त्यात हरतालिका पूजन, ऋषी पंचमी सण महिला एकत्रितपणे साजरा करतात. वार्षिक ओवसा, नवीन ओवसा कार्यक्रम यादरम्यान पाहण्यास मिळतो. गावात वाडय़ावाडय़ांमधील भजन मंडळींची भजनेही यानिमित्ताने आयोजित केली जातात. अगदी तीन पिढय़ांमधील आजोबा, मुलगा, नातू सर्व भजनात तल्लीन होतात. सातव्या दिवशी गणपती विसर्जनावेळी लक्षणीय गर्दी पाहण्यास मिळते. माहेरवाशीणींना सुरुवातीच्या दिवसात दर्शनासाठी येता येणे शक्य होत नसले तरी शेवटच्या दिवशी दर्शन आणि नवसाची परतफेड करण्याच्या उद्देशाने त्या आवर्जून हजेरी लावतात.

भात उत्सव लेखशेती आणि पायवाट
‘सावंत कुटुंबीयांच्या राजा’ची विसर्जन मिरवणूक लक्षवेधी असते. पूर्वांपार चालत आलेल्या वाटेवरून म्हणजेच भातशेतीतून ही मिरवणूक मार्गक्रमण करते. यावेळी असंख्य जणांच्या चालण्यामुळे शेती पूर्णपणे जमीनदोस्त होते. मात्र तिसऱयाच दिवशी ती पुन्हा डौलाने उभी राहते. त्याच वाफ्यांमध्ये भाताचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते अशी येथील भक्तांची धारणा आहे.